Sshree Astro Vastu

वाचाल ना?

ह्या 17 मेला श्रीयुत जयंत नारळीकर यांच्या सुविद्य पत्नी, मंगलाताई यांचा 80 वा वाढदिवस आहे. मृणालिनी चितळे यांनी किती सहजतेने, अगदी साध्य शब्दात किती छान लिहिले आहे!!! त्या बोलत आहेत असेच मला वाटले. तुम्हालाही आवडेल.

तिचं मंगलपण...

गणितज्ञ डॉ. मंगल नारळीकर! विख्यात खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचीक पत्नी. माझी आत्ते नणंद. माझ्यापेखा पंधरा वर्षांनी मोठी, परंतु तिच्याशी गप्पा मारताना, ना कधी तिच्या बुध्दिमत्तेचं आणि प्रसिद्धीचं वलय आड येतं, ना वयातील अंतर. गप्पांच्या ओघात आपण मैत्रीच्या पातळीवर कधी उतरतो हे कळत नाही. हा माझ्या एकटीचा नाही, तर तिच्या सहवासात येणाऱ्या अनेकांचा अनुभव. नुकतीच १७ मे रोजी वयाची ८० वर्षे तिनं पूर्ण केली आहेत. त्या निमित्ताने तिच्या हरहुन्नरी व्यक्तिमत्वाची एक झलक.

गणित म्हणलं की भल्याभल्या हुशार लोकांना धडकी भरते, परंतु गणिताविषयी जन्मजात प्रेम असणाऱ्या मंगलताईसारख्या व्यक्तींच्या दृष्टीनं गणित म्हणजे नुसती आकडेमोड नसते तर पूर्णत्वाकडे घेऊन जाणारी वहिवाट असते. या संबंधीची तिच्या लहानपणची एक आठवण. एकदा हौसेनं ती पुऱ्या तळायला बसली होती. तिला कुणीतरी काही विचारलं असता ती पटकन म्हणाली, “मध्ये बोलू नकोस, माझे आकडे चुकतात. पुरी तेलात टाकल्यावर सहा आकडे मोजून झाले की मी उलटते आणि बारा आकडे मोजून झाले की तेलातून काढते. त्यामुळे सगळ्या पुऱ्या टम्म फुगतात आणि पाहिजे तेवढ्या खमंग होतात.” आपल्याला क्षुल्लक वाटणाऱ्या गोष्टी अंकगणितामध्ये बसवायची आणि अचूक पद्धतीनं करायची तिला अशी लहानपणापासून आवड होती.

मंगलताई ही पूर्वाश्रमीची मंगल राजवाडे. शालेय जिवनापासून अनेक बक्षिसे मिळवत ती एम.ए. झाली. मुंबई विद्यापिठात सर्वप्रथम आली. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (टीआयएफआर) या संस्थेमध्ये तिनं संशोधनाला सुरवात केली, परंतु तिच्या करिअरला यू टर्न मिळाला तो १९६६ साली जयंतरावांशी झालेल्या विवाहामुळे. जयंतरावांनी तरुण वयात फ्रेड हॉईल यांच्याबरोबर केलेल्या संशोधनामुळे जगप्रसिध्द शास्त्रज्ञ म्हणून सर्वजण त्यांना ओळखत होते. लग्नानंतर केंब्रिजमध्ये तिनं संसाराचे प्राथमिक धडे गिरवताना गणित विषयातील अध्ययन चालू ठेवले.

तिची हुशारी बघून चर्चिल कॉलेजमध्ये टीचिंग फेलोशिपसाठी तिचं नाव सुचवलं गेलं, परंतु जयंतरावांना विविध देशांमध्ये व्याख्याते म्हणून निमंत्रित केलं जात असल्याने हा प्रस्ताव तिनं नाकारला. पुढे १९७२ साली भारतात परत येण्याचा निर्णय दोघांनी मिळून एकमताने घेतला. त्यामागे आपल्या मातृभूमीविषयी वाटणारं प्रेम तर होतंच शिवाय आपल्या वृध्द आईवडलांची जबाबदारी घ्यायला हवी ही जाणीव होती आणि आपल्या मुलींवर भारतीय संस्कार व्हावेत अशी इच्छाही. भारतात आल्यावर जयंतरावांनी टीआयएफआरमध्ये संशोधन आणि अध्यापनाचे काम सुरु केले. मंगलताईनं तिचं पीएच. डी. चे काम हाती घेतलं. १९८१ साली संश्लेषात्मक अंक सिध्दांत या विषयात पीएच. डी. मिळवली आणि पदव्युत्तर आणि एम. फिल.च्या विद्यार्थ्यांसाठी अध्यापनाचे काम सुरू केलं. अनेक संशोधनात्मक लेख लिहिले. शालेय विद्यार्थ्यांसाठी गणितगप्पा, गणिताच्या सोप्या वाटा यासारखी पुस्तकं लिहिली. ही झाली तिची औपचारिक ओळख. कुणाही कुशाग्र बुद्धिमत्ता लाभलेल्या व्यक्तीची असते अशी; परंतु मंगलताईचं वैशिष्ट्य असं की गणितामुळे आत्मसात केलेलं तर्कशास्त्र आणि जयंतरावांच्या सानिध्यात वृध्दिंगत झालेला विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात तिनं जपला.

स्वयंपाकघर नव्हे प्रयोगशाळा

अनेकदा वेगवेगळ्या देशांत राहायची संधी मिळाल्यामुळे तेथील पाककृती तिनं शिकून घेतल्या. त्या जशाच्या तशा बनविण्यात ती वाकबगार आहे. चाळीस वर्षांपूर्वी तिच्या विदेशी पाककृतीसाठी लागणारे मालमसाले सहजगत्या उपलब्ध व्हायचे नाहीत. तेव्हा त्यांच्या योग्य देशी पर्याय तिनं निवडले. मॅपल सिरप ऐवजी वेगवेगळ्या स्वादाची काकवी. ओरॅगॅनोऐवजी ओव्याची ताजी पानं तर चीजकेकसाठी पनीर. ‘हर्बल टी’ बनविण्यासाठी बागेतील फुलापानांचा वापर ती करते, तेव्हा ते खाण्यायोग्य आहेत यांची शहानिशा केल्यावरच. घरच्या कुंडीत वाढलेली मोहरीची कोवळी रोपं सँण्डविच आणि सॅलेडमध्ये घातल्यावर स्वाद वाढविणारी कशी ठरतात याचा अनुभव मी तिच्याकडे घेतला आहे. बटाटेवड्याचं सारण हरबरा डाळीच्या पिठात बुडवून तळण्याऐवजी उडदाची डाळ भिजवून, वाटून त्याच्या पिठात बुडवून तिनं तळले तेव्हा वड्यांची चव अफलातून लागत होती. कुठेतरी वाचलेले किंवा कुणाकडे तरी खाल्लेले पदार्थ लक्षात ठेवून त्यात यथायोग्य बदल करण्याची प्रयोगशीलता तिच्याकडे आहे. रोजचा स्वयंपाक करताना किंवा पाहुण्यांसाठी बनवतानाही त्यामध्ये पिष्ठ, प्रथिन, स्निग्ध पदार्थांचा समतोल साधण्याचा तिचा प्रयत्न असतो. ठरावीक मोसमात मिळणारी फळं वर्षभर खायला मिळावीत यासाठी त्यावर शास्त्रीय पद्धतीनं प्रक्रिया करण्यात ती पटाईत आहे. एकदा तिच्या नेहमीच्या फळवाल्यानं ती मोठ्या प्रमाणात संत्री कशासाठी नेते म्हणून कुतूहलानं विचारलं. तेव्हा संत्र्यापासून बनवलेल्या मार्मालेडची बाटली तिनं त्याच्या मुलांसाठी भेट दिली. एवढंच नाही तर बियांमधील पेप्टीनचं महत्त्व त्याला सांगायला ती विसरली नसणार. कच्च्या पालेभाज्यांचा वापर करताना त्या पूर्णपणे निर्जंतुक करण्यासाठी पोटॅशियम परमँगनेटचा वापर ती करते. पोटॅशियम पाण्यात टाकलं की पाण्यातील प्राणवायू शोषून घेते. त्यामुळे त्या पाण्यात भाज्या बुडवून ठेवल्या की कीड मरून जाते, शिवाय पोषण मूल्य अबाधित राहते हे त्यामागचं शास्त्र! करोना काळात  घराघरातून सॅनिटायझरने भाज्या, फळे धुतली गेली नि करोनाचा प्रादुर्भाव कमी झाला तशी ही कृती विस्मृतीत गेली. मंगलताई मात्र कटाक्षाने स्वयंपाकघरातील विज्ञान कायम आचरणात आणत आहे.

प्रत्येक गोष्टीचा वापर... पुनर्वापर

होता होई तो, एकही गोष्ट वाया घालवायची नाही आणि पर्यावरणाला हानी पोचेल असं काही करायचं नाही याचा वसा तिनं घेतला आहे. त्यासाठी तिच्यातील कलागुणांना तिनं कल्पकतेची जोड दिली आहे. सभासमारंभात मिळणाऱ्या शालींचे  मुलांसाठी गरम कोट स्वत: शिवून अनेकांना भेट दिले आहेत. लहान मुलांसाठी कपडे शिवताना कपड्यांना ती अस्तर अशा खुबीने लावते की त्याची शिवण अजिबात टोचू नये. साडीबरोबर येणाऱ्या डिझाईन्सच्या ब्लाउज पिसमधून नातींसाठी झबली, परकर पोलकी शिवली आहेत. नुकतंच तिनं मला मायक्रोव्हेवमध्ये ठेवून गरम करता येईल असं हिटिंग पॅड भेट दिलं. आयताकृती कापडाला कप्पे करून त्यामध्ये धान्य भरल्यानंतर ते शिवून टाकले होते. मायक्रोव्हेवमध्ये ठेवल्यावर हे पॅड त्यातील धान्यासह गरम होते आणि बाहेर काढून मस्त शेक घेता येतो. हे पॅड कुणाकडे तरी पाहून तिनं बनवलं असलं तरी ते बनवण्यासाठी घेतलेले कष्ट आणि सुबकता वाखाणण्याजोगी आहे. लॉक डाऊनच्या सुरवातीला जुन्या मऊ साड्या वापरून, तिनं तीन पदरी मास्क बनवले. अगदी एन ९५ मास्क इतकेच सुरक्षित ठरावेत असे. दरवर्षी राख्या ती स्वत: बनवते. एकदा तिच्या राहत्या इमारतीच्या वरती मधमाशांनी पोळी केली. माणूस बोलवून तिनं पोळी तर उतरवलीच पण त्यांनतर स्वच्छ कपडानं मध गाळून घरोघर वाटण्याचा उपद्व्याप केला. घरात नवा फ्रिज घेतल्यावर त्याचं भलं मोठं खोकं टाकून न देता नातींना खेळायला दिलं. नातींनी त्यामध्ये दारखिडक्या कापून एक झोपडी बनवली. उरलेल्या कचऱ्यातून मंगलताईनं झोपडीच्या दारांसाठी कड्या – नातींच्या शब्दात ‘क्लेव्हर बोल्ट.’ बनवले. आजीनातींचा खेळ अजूनही रंगला असता, परंतु दिवाणखान्यात ती झोपडी इतकी मध्येमध्ये यायला लागली की तिला आपल्या घरी घेऊन जाण्याचा वटहुकुम जयंतरावांना काढावा लागला. अलीकडे ते थकल्यामुळे पायी फिरायला बाहेर पडलं की त्यांना मध्येमध्ये बसावं लागे. वाटेत बाक असत, पण त्यांची उंची कमी असल्याने ते सोयीचे ठरत नसत. मंगलताईनं लगेच यावर तोडगा काढला. घरच्या उशीला पट्टा शिवला. पर्सप्रमाणे ती उशी स्वत:च्या खांद्याला लटकवून फिरायला जाण्यात खंड पडू दिला नाही.

लेखन... वाचन... सामाजिक बांधिलकीचं भान...

जयंतराव आणि मंगलताई दोघांनाही अभिजात साहित्याची विलक्षण जाण आहे आणि आवडही. त्यांच्या दिवाणखान्यातील कपाटं पुस्तकांनी खचाखच भरलेली असतात आणि टीपॉयवर पुस्तकं नि मासिकं ढिगानं रचलेली असतात. दोघांनी विपुल लेखन केलं आहे. मंगलताईनं तिच्या लेखनातून आपल्या समाजातील चुकीच्या प्रथापरंपरांवर अनेकदा टीका केली आहे तर कधी अनेक गोष्टींमागचं विज्ञान उलगडून दाखवलं आहे. जयंतरावांनी लिहिलेल्या ‘आकाशशी जडले नाते’ या ग्रंथांचे तिनं इंग्रजीत भाषांतर केले आहे. दोन्ही भाषांवर प्रभुत्व असल्यामुळे ही गोष्ट शक्य झाली, हे निश्चित! तिला आवडलेली पुस्तकं अनेकांपर्यंत पोचावी, या उद्देशानं, ती पुस्तकांच्या प्रती विकत घेऊन ग्रंथालयांना भेटीदाखल देते. लेखनवाचनाइतकाच शिक्षकी पेशा तिच्या रोमारोमात भिनला आहे. तिचं वैशिष्ट्य असं की पदव्युत्तर विद्यार्थ्यांना शिकवताना तिला जेवढा आनंद मिळतो तेवढाच आनंद पहिलीदुसरीतल्या मुलांना शिकवताना मिळतो. काय शिकवतो यापेक्षा आपण जे शिकवतो ते समोरच्यापर्यंत पोचणं तिला महत्वाचं वाटतं. आत्तापर्यंत आर्थिक कमकुवत गटातील असंख्य शाळकरी मुलांना तिनं तन्मयतेनं शिकवलं आहे. अनेकांना शिक्षण, आजारपण यासाठी मदत केली आहे, परंतु लग्नखर्चासाठी म्हणून कुणी पैशाची मागणी केली तर ती नाकारण्याइतका सडेतोडपणा तिच्यापाशी आहे.

आजाराशी दोन हात

विविध आघाड्यांवर कार्यरत असताना १९८६ साली वयाच्या त्रेचाळीसाव्या वर्षी कॅन्सरशी सामना करायची वेळ तिच्यावर आली. शरीरमनाची ताकद खच्ची करणाऱ्या आजाराला तिनं खंबीरपणे तोंड दिलं. त्यानंतर १९८८ साली आणि अलीकडे २०२१ आणि २०२२ साली त्यानं परत डोकं वर काढलं. प्रत्येक वेळी आपली सारी व्यवधानं सांभाळत अपराजित वृत्तीनं ती लढली आहे. आजही लढत आहे. तिच्या तिन्ही मुली आणि जगभर विखुरलेले असंख्य सुहृदजन तिची काळजी घेत आहेत. तिची हिंमत पाहून स्तिमित होत आहेत.

मंगलताईच्या व्यक्तिमत्वाचं एका शब्दात वर्णन करायचं ठरवलं तर ओठावर शब्द येतो, ‘सहजता’. सहजता हाच तिच्या व्यक्तिमत्वाचा स्थायीभाव आहे. एकाच वेळी ती करत असलेल्या असंख्य गोष्टी पाहून बघणाऱ्याला वाटतं हे सगळं सहजसोपं असतं म्हणून. कारण हे सगळं करताना आपण खूप काही करतोय असा तिचा भाव नसतो नि अभिनिवेशही. असते ती तिची गणिती बुद्धी आणि कलावंताची मनस्वी वृत्ती. त्यामुळे काळ, काम वेगाचं व्यस्त गणित ती बिनचूक रीतीनं सोडवू शकली आहे. तिच्या वाट्याला आलेली प्रश्नपत्रिका नक्कीच सोपी नव्हती. कठीण प्रसंग… अवघड माणसं तिच्याही आयुष्यात आली. परंतु रडतकुढत न बसता सगळ्यांना तिनं व्यवस्थित कोष्टकात बसवलं. तिच्या बोलण्यात स्पष्टपणा असतो, तेवढाच मायेचा ओलावाही. शिस्त असते, पण शिस्तीची धास्ती वाटावी इतकी कठोर ती कधीच नसते. यातच तिच्या व्यक्तिमत्वातील ‘मंगलपण’ सामावलेलं आहे.

 

  • मृणालिनी चितळे
...म्हणूनी गुणी जनांना योग्य तो मान द्यावा!!
Share This Article
error: Content is protected !!
×