Sshree Astro Vastu

छत्रपती शाहू महाराज त्यांच्यातील माणुसपणाची गोष्ट

कथा एका "माणसाची"

आठवडी बाजार संपला होता. माणसं बैल जुंपून गावाच्या दिशेनं परतीला लागली. नुसती धूळ शिल्लक उरलेल्या त्या बाजारातील आया बाया सुद्धा चपला फरफटत चालू लागल्या. म्हातारी आजी पाटी कमरेवर घेऊन ताठ उभी राहिली.

 

फाटक्या चपलेला वादी बांधून त्यात पाय सरकवला. धूळ खाऊन मातकट झालेली चुंबळ रिकाम्या पाटीत टाकली. लाडवांची पुरचुंडी प्लास्टिकच्या पिशवीत चुंबळीच्या पदराखाली सरकवली. आजी एसटी च्या खांबाशी पोहोचते, तो एसटी निघून गेली होती. बांगडीवाल्या मुलाने तिला हटकलंच, “म्हातारे, आज उशिरसा ?”

 

माल संपेसंपेतो उशीर झाला होता. पण आज बक्कळ पैसे जमले होते. त्यातूनच तिनं खरेदी केली होती. कुणाला तरी हे उत्साहानं सांगावं, असं तिला पण वाटत होतं.

तेवढ्यात समोरुन मोटार येताना दिसली. आजीनं चटकन विचार केला, एस्.टी.ला दोन आणे पडणारच होते. याला एक आणा जास्त देऊ.

पण अंधारायच्या आत घरी तर पोहोचू! आजीने आपला काळा फाटकोळा हात झेंड्यासारखा हलवला. गाडी कचकन ब्रेक लावून थांबली. ड्रॉयव्हर तसा रुबाबदार गडी वाटला. तो आजीकडे बघून हसला.

“काय पायजे आजी?” त्यानं विचारलं.

आजीला त्यातल्या त्यात बर वाटून गेलं.

 

म्हातारी म्हणाली, “माका सत्तर मैलार जांवचा आसा. सोडशील रे? यष्टी चुकली बग!”

ड्रॉयव्हर खाली उतरला. म्हातारीची पाटी डिकीत टाकली आणि तिला आपल्या बाजूच्या सीटवर बसायला सांगितलं.

आजी हरकली. चक्क पुढं बसून जायचं?

आणि गाडीत कोणी पॅसेंजर्स नाहीत.

 

पण तिला हळहळपण वाटली.

बिचाऱ्या ड्रॉयव्हरला आज मिळकतच नाही.

ती म्हणाली, “ह्यां बग, यष्टीवाले दोन आने घेता.

मियां तुका तीन आणे देतयं. चलात?”

 

ड्रॉयव्हर हसत म्हणाला, “आजी, तुला परवडतील ते दे. तू मला मायसारखी.”

 

आजीचा जीव सुपाएवढा झाला. ती मायच्याच हक्कानं ऐसपैस बसली.

गाडी सुरु झाली. बांगडीवाला मुलगा तोंड वासून आश्चर्यानं पाहत होता.

गाडी हलली तसा तो ओरडलाच,

“अगे म्हातारे…..”

पण आजीला आता त्याच्याकडे बघायला सवड कुठं होती?

मऊ गादीवर आजीला फार सुख वाटलं, एस्.टी.सारखी गर्दी नाही, कचकच नाही.

गाडी कशी भन्नाट निघाली होती.

 

आजीनं मनातल्या मनात ड्रॉयव्हरला मार्क देऊन टाकले. दिवस भराच्या उन्हान, धुळीनं ती थकली होती. आता निवांत झाल्यावर तिला छान डुलकी आली.

 

“आजी, तुझा सत्तर मैलाच्या दगड आला बघ. इथंच उतरायचं ना?”

 

आजी खडबडून उठली. कनवटीचे तीन आणे काढून ड्रॉयव्हरच्या हातावर ठेवले.

 

तेवढ्यात त्यानं डिकीतून तिची पाटी काढून दिली. म्हाताऱ्या आजीला काय वाटलं कोण जाणे. तिनं अलवार हातानं पुडी उलगडली.

त्यातला शेवकांडचा एक लाडू काढला.

ड्रॉयव्हरच्या हातावर टेकवत म्हणाली,

“खा माझ्या पुता !”

ड्रॉयव्हरनं हातातल्या लाडवाकडं आणि म्हातारीकडं डोळे भरुन पाहिलं.

 

गाडी निघाली, तसा बाजूला उभा असलेला माणूस म्हणाला,

“कुणाच्या गाडीतून इलंय?””

“टुरिंग गाडीतनं.” आजी म्हणाली.

आजीचं बोलणं ऐकून तो माणूस आणखीच

बुचकळ्यात पडला. तशी आजी खणखणीत आवाजात म्हणाली

“तीन आणे मोजून दिलंय त्येका”

 

“त्यांनी ते घेतलं !! अग म्हातारे, तुझं डोकं फिरलं की काय ?”

 

“टुरिंग कार नव्हती ती.आपल्या राजांची गाडी. या आपल्या कोल्हापूरच्या शाहु महाराजांच्या शेजारी बसून आलीस तू!” दुसऱ्यानं माहिती पुरवली.

 

“अरे माझ्या सोमेश्वरा !! रवळनाथा !!” म्हणत

म्हातारी भुईला टेकली. गाडी गेली त्या दिशेनं

तिन भक्तिभावानं हात जोडले.

 

आपल्याला ‘माय’ म्हणणाऱ्या आणि गरिबांच्या टोपलीतला शेवकांडाचा लाडू खाणाऱ्या, त्या लोकराजाच्या आठवणीनं तिच अंतःकरण भरुन आलं.

 

हाच तो आधी “माणूस” बनलेला लोकराजा. त्यांच्या कार्याबद्दल आणखी काही सांगण्याची गरज नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा वारस.

 

Share This Article
error: Content is protected !!
×