Sshree Astro Vastu

Teacher A Servant

गुड मॉर्निंग सर !

 गुड मॉर्निंग ! या पाटणकर. कुठल्या गावाहून आलात?

 ‘कोकिजरे , तालुका – वैभववाडी’.

 ‘हा. म्हणजे सह्याद्री पट्टा. शिक्षण कोठे झाल?’

 शाळा कोकिजरे, बी.एस.सी कणकवली कॉलेज, एम.एस.सी, कोल्हापूर, बी.एड.-गारगोटी’

 ठीक. म्हणजे शिवाजी विद्यापीठ, तुमच एम.एस.सी ला फिजिक्स विषय होता ना?

 ’हो सर.’

 नाही, विचारण्याच कारण म्हणजे आमच्या शाळेत फिजिक्स ची व्हेकन्सी आहे आणि तुम्ही केमेस्ट्रि नायतर बायोलॉजी मध्ये एम.एस.सी केलं असेल.

 ‘नाही सर! मी फिजिक्स मध्ये एम.एस.सी केलय.’

 शिकवण्याचा काही अनुभव? तेथे उपस्थित असलेल्या साळगांवकर मॅडम ने विचारले.

 ‘मॅडम, मी दोन वर्षे कणकवलीत एका क्लासमध्ये शिकवत होतो.’

 ‘मग तेथला जॉब का सोडला?’

 पैसे फार मिळत नव्हते म्हणून, पाटणकर हळूच म्हणाले.

आमच्याकडे सुद्धा शिक्षण सेवक म्हणूनच जागा आहे बरं का. सरकारी ग्रॅण्ट नाही. त्यामुळे …. काय तो विचार करा.

पण पुढे मागे सरकारी ग्रॅण्ड मिळेल ना मॅडम.

हा आमचे प्रयत्न सुरुच असतात. पण सरकारचे नियम दिवसाला बदलतात. ग्रॅण्ट मिळाली तर तुमचा फायदा होईल.

हो सर.

अकरावी- बारावी  फिजिक्स बरोबर प्रॅक्टिकल पण घ्यावा लागेल. शिवाय खेडेगावातील शाळा आहे. इथे प्रायव्हेट क्लास वगैरे नाही. त्यामुळे शनिवारी, रविवारी तसेच सुट्टीत जादा तास घ्यावे लागतील.

हो सर. माझी तयारी आहे.

मग ठीक आहे. मुख्याध्यापक जोंधळे आहेत. त्यांना भेटा . तुमची सर्टिफिकेट्स जमा करा आणि १० जून पासून वर्ग सुरु होतील. तेव्हा हजर व्हा.

 पण सर, पगार किती मिळेल?

ते तुम्हाला, कोळंबकर नावाचे क्लार्क आहेत, ते सांगतील.

अशारितीने पाटणकरांचा इंटरव्ह्यू पार पडला. एम.एस.सी झाल्यानंतर दोन वर्षे नोकरीसाठी शोधाशोध करुन शेवटी या गावातील शाळेत अकरावी- बारावी साठी फिजिक्स शिक्षकाची जागा खाली आहे. हे पेपर मध्ये वाचल्यानंतर पाटणकरांनी अर्ज केला आणि त्यांची निवड झाली.

चेअरमनांच्या ऑफिसमधून बाहेर पडुन पाटणकर मुख्याध्यापक जोंधळे सरांना शोधायला निघाले. जोंधळे सर त्यांच्या ऑफिसमध्ये मोबाईल मध्ये रंगात आले होते. दोन मिनिटे त्यांचे आपल्याकडे लक्ष जाते काय, हे पाटणकर पाहत राहिले. पण जोंधळे कसलासा सिनेमा पाहण्यात दंग होते. शेवटी पाटणकर त्यांच्या टेबलासमोर उभे राहिले.

सर, नमस्कार! मी नारायण पाटणकर. जोंधळे दचकले. मग सावरत म्हणाले, ‘बरं मग, मी काय करु?’

‘सर, मी हायर सेकंडरी मध्ये फिजिक्स विषयासाठी अर्ज केला होता. आताच चेअरमन साहेबांनी माझा इंटरव्ह्यू  घेतला. त्यांनी तुम्हाला भेटायला सांगितले. ’

असं होय. इंटरव्ह्यू दिला काय आणि न्हाई दिला काय. तुम्हीच शिलेट होणार. का सांगा?

का?

कारण ह्या खेडेगावात सहा हजार रुपड्यात यांना कोण मास्तर भेटणार?

किती ? सहा हजार फत ?

मग, सहा लाख वाटले की काय? हा आता मला दीड लाख पगार हाय. सातवा आयोग बरं का.

पण, चेअरमन नी तुम्हाला भेटायला सांगितलय.

हा. भेटलात म्हणून सांगा. त्यो कोलंबकर क्लार्क हाय का बघा. त्याचेकडं सर्टिफिकेट जमा करा आणि नऊ तारखेला या. कारण आदल्या दिवशी मिटींग असते. मॅनेजमेंट आणि शिक्षक यांची.

 पाटणकर बाहेर पडले आणि क्लार्क कोळंबकरला शोधू लागले. कोळंबकर मोबाईल मध्ये रमी लावत बसला होता. पाटणकर त्याच्या समोर उभे राहिले.

‘कोळंबकर मी पाटणकर.’ कोळंबकर रमीत व्यत्यय आला म्हणून वैतागला. त्याने चिडून विचारले, काय काम आहे? 

इथं या शाळेत फिजिक्स शिकवण्यासाठी मी १० तारीख पासून येणार आहे. मुख्याध्यापकांनी तुम्हाला भेटायला सांगितले.

होय काय. बरा बरा. हेंका नवीन नवीन बकरो बरो गावता.

‘बकरो? ’

नायतर काय. सहा हजारात या खेडेगावात कोण येतलो? बरा ता जावंदे. तुमची सर्टिफिकेटा घेवन येवा. पाटणकर नोकरीस हजर होण्याआधीच हैराण झाला. बायकोला काय सांगणार? तिला काल म्हटले, फिजिक्स च्या शिक्षकाची नोकरी आहे. ति खूश.  ती शिक्षकांचे हल्ली लाखात पगार ऐकून होती. तिला शिक्षण सेवक हा मधला प्रकार माहित नव्हता.

 मोडक्या एम.एटी वर बसून फूर फूर करत पाटणकर आपल्या गावी निघाला. या गावाहून आपले गाव चाळीस किलोमीटर म्हणजे याच गावात बिर्‍हाड करावे लागणार. बिर्‍हाड केले की खर्च वाढणार. गावी चार माणसांत दोन माणसे खपून जात होती. आता खोलीचे भाडे, इलेट्रीसिटी, मुलासाठी दूध, सर्वच विकत. आणि हे सर्व सहा हजार रुपयात भागवायचे कसे?

 शाळेतून बाहेर पडल्यावर काही अंतरावर त्यांना लहानशी बाजारपेठ दिसली. पाटणकरांनी  फटफटी थांबविली. एक किराणा दुकान, एक लहानसे चहाचे हॉटेल, एक पानपट्टी आणि एक लाकडी खुर्चीचे सलून. सलून पाहताच पाटणकर पुढे गेले. खरंतर हा आपला पारंपारिक धंदा. आजोबा, काका वडिलांनी हाच व्यवसाय केला. पण वडिलांनी एकतरी मुलगा शिकावा म्हणून पोटाला चिमटा घेऊन आपल्याला कोल्हापूरात शिकायला पाठवले. आपला मुलगा डबल ग्रॅज्युएट झाला म्हणून वडिलांना कृतकृत्य वाटले.

 ज्याला त्याला मुलाची हुशारी सांगत सुटले. त्यांना वाटलं ‘आपलो झील कॉलेजात शिकवतोलो. फाड फाड इंग्रजी बोलतोलो. चार चाकी गाडीतून फिरतोलो.’ पण आपण झालो शिक्षण सेवक.

 पाटणकर त्यातल्या त्यात मोठ्या असलेल्या किराणा दुकानदाराकडे गेला. हा नवीनच माणूस दिसतोय म्हणून किराणा दुकानदाराने चौकशी सुरु केली.

 ‘खयसुन ईलात?’

 ‘मी पाटणकर. गांव कोकिसरे. ह्या शाळेत शिक्षक म्हणून ईलय.’

 ‘खयचो विषय?’

 ‘फिजिस. अकरावी -बारावी साठी.’

‘अरे बापरे! म्हणजे तुम्ही डबल ग्रॅज्युएट शिकला असतालात. आणि हय शिक्षण सेवक? सहा-सात हजारात गुंडाळतले.’

काय करतले. नोकरी खय गावता?

चेअरमन भेटलो की नाय? आणि दुसरा ता बायलमाणूस. साळगावकरीन. तेची मैत्रिण ती.

असेल. चेअरमन होते आणि त्या बाई पण होत्या. आणि हेडमास्तर जोंधळो जागो होतो का झोपलेला?े.

होते ना.

एक नंबर चिकट माणूस. पाच रुपये खर्च करुचो नाय. लाखाच्या वर पगार घेता. सगळो पैसो गावात धाडता. तिकडे लातूर काय उस्मानाबाद तिकडचो आसा तो. तिकडे बंगलो बांधल्यान. शेती घेतल्यान. पण आमच्या दुकानाची उधारी देना नाय. पण तुम्ही कोकिसर्‍यातून जावन येवन करतालात? खूप लांब पडताला.

हय रवाचाच लागताला ओ. क्लास  वगैरे पण घेवक हवे असा चेअरमनांनी सांगितल्यानी.

सहा हजार रुपयात दिवसभर शिकवायचा आणि शनिवारी- रविवारी क्लास घ्यायचे. अरे मेल्यानू ह्या मास्तरांका २५ हजार पगार तरी देवा. तुम्ही रात्रीच्या पार्टेक आठ-दहा हजार घालवतात. बरा मास्तर, जागा खय बघितलास काय?

नाय, ओ. ताच विचारुक ईल्लय.

ह्या बघा आमचो मांगर आसा. बंद असता. तुमका जमला तर रवा.

पण भाडा?

ह्या पगारात भाडा काय देतालात ओ? भाडा नको. फत माझो झील आसा आठवीत तेच्या अभ्यासार लक्ष ठेवा.

हो. हो. निश्चित. पण पाण्याची सोय वगैरे ?

विहीर आसा. भरपूर पाणी. मांगरात एक मोरी आसा. विठू, मास्तरांका मांगर उघडून  दाखव. दुकानदार मिराशी चा नोकर विठू पुढे चालू लागला तसे मास्तर तेच्या मागून गेले. पाटणकरांनी मांगर पाहिला. जागा बरी होती. बाहेर एक खोली आत एक. त्याखोलीत मोरी. मांगराला मागचे दार होते. थोड्या अंतरावर विहीर होती. विहीरीवरुन बायका पाणी नेत होत्या. म्हणजे बायकोला वनिताला सोबतीण मिळणार. पाटणकरांना जागा बरी वाटली. त्यांनी दुकानदार मिराशींना सांगून टाकले. रविवारी सामान घेवून येतो. मिराशी म्हणाले, भाडा नको. पण लाईट बिल तेवढा भरा. पाटणकर घरी जायला निघाले. त्यांचे लक्ष परत त्या छोट्याशा सलून कडे गेले. आता सलून मध्ये कुणीतरी दाढी करायला बसला होता. ह्या व्यवसायामुळे आपली भावंडे, आई-वडिल दोन घास जेवतात. ह्या सलूनाचा पाटणकरांना आधार वाटला.

 रविवारी सकाळी पाटणकरांची बायको वनिता आपल्या दोन वर्षाच्या मुलासह एस.टी ने आली. त्याच्या आधी पाटणकर येवून पोचले होते. मिराशींच्या दुकानातील झाडूने त्यांनी मांगर स्वच्छ केला आणि सोबत आणलेल्या कळशीने दोन बादली पाणी भरुन ठेवले. मिराशींच्या बायकोने चूल पेटवायला म्हणून सोडणे, झावळ्या, थोडी लाकडे दिली. वनिता ने सोबत आणलेल्या तांदळाची पेज आणि मिराशींच्या वाट्यावर चटणी वाटली. मिराशींच्या दुभत्या म्हशी होत्या, त्यामुळे दुधाचा प्रश्न मिटला. आणि पाटणकरांचा संसार या नवीन गावात सुरु झाला.

 दुसर्‍या दिवशी पाटणकर शाळेत हजर झाले. अकरावी साठी फिजिक्स शिकवायला वर्गात गेले. मुला-मुलींची ओळख करुन घेताना त्यांच्या लक्षात आले की मुल त्यामानाने मोठी आहेत. बहुतेकजण अठरावर्षापेक्षा जास्त वयाची होती. चौकशी करताना समजले, हुशार मुलं दुसरीकडे शिकायला गेली आणि ज्या मुलांना पुढे शिकायच नव्हत ती मुलं या शाळेत येत होती. पाटणकरांनी फिजिक्स मधल सरफेस टेंशन हा धडा शिकवायला सुरुवात केली. त्यांनी फळ्यावर डायग्राम काढून थोड इंग्रजीत, थोड मराठीत शिकवायला सुरुवात केली.

 काही वेळा नंतर शिकवलेल्या अभ्यासाच्या नोटस् लिहायला घातल्या. सहजच, ते खाली उतरुन विद्यार्थ्यांच्या वह्या बघायला गेले तर त्यांना आश्चर्य वाटले. बहुतेक मुलांनी काहीही वहीत लिहीले नव्हते. मुलांचे म्हणणे त्यांना इंग्रजी लिपी व्यवस्थित येत नाही. त्यांनी एका मुलीला उठविले. अगं, मी घातलेले तु का लिहीत नाहीस?

सर, आमका इंग्रजी येना नाय. मराठी येता. मराठीत अभ्यास घाला.

अगं, पण परिक्षा इंग्रजीत असते. सर्व सायन्स इंग्रजीत शिकावे लागते.

पण आमका इंग्रजीची भिती वाटता.

मग दहावीत पास कसे झालात तुम्ही?

एक मुलगा मागून ओरडला. कॉपी करुन.

म्हणजे?

आमचे इंग्रजी चे शिक्षक चाळीस मार्काचा सगळ्यांका सांगत. म्हणून आम्ही पास झालो.

मग तुम्ही सायन्स ला का अ‍ॅडमिशन घेतलीत?

आमका पुढे नर्सिंग करुचा आसा. बारावी सायन्स झालव की नर्सिंग मध्ये अ‍ॅडमिशन गावतली.

मग बारावी पास व्हायला लागेल ना?

दहावी पास झालव तसे बारावी पास होतोलव.

पाटणकरांनी डोयाला हात लावला. लेचर संपल्यानंतर त्यांना केमिस्ट्री शिकवणारे सावंत सर भेटले. सावंत सर, गेली दहा वर्षे म्हणजे सुरुवातीपासून येथे केमिस्ट्री शिकवत होते.

‘सावंत सर, मी आता अकरावी वर फिजिक्स शिकवण्याचा प्रयत्न केला, पण मुलांना साधं एबीसीडी येत नाही. त्यामुळे मी नोटस् घालत होतो ती कोणी लिहून पण घेतली नाहीत.’

‘त्यात नवीन ते काय? मी गेली दहा वर्षे इथे शिकवतोय. अशीच मुले आहेत या ठिकाणी.’

‘मग, ती बारावी पास कशी होणार?’

‘नाही होईनात. आपल्याला पगार मिळण्याशी मतलब. मी परमनंट शिक्षक आहे. माझ कोणी काही करु शकत नाही आणि  मॅनेजमेंट ने जास्त गडबड केली तर आमची युनियन आहे. मी घाबरत नाही कोणाला. तुझ काय ते बघ कारण तु शिक्षण सेवक.’

‘होय ना, सावंत सर. मी शिक्षण सेवक आहे. मला मॅनेजमेंट विचारत राहणार.’

‘हे बघ पाटणकर, तुला इथे टिकायचे असेल तर सांगतो. तु शिकवण्याचे काम करतो. प्रॅटीकल्स घे. सर्व चाचणी परिक्षेत मुलांना पास कर. अकरावीत सर्वांना पास कर कारण ते तुझ्या हातात आहे. बारावीत बघू, त्यांच्या काय नशिबात असेल ते. दोन वर्षांनी दुसरीकडे नोकरी बघ.’

 पाटणकर गप्प झाले. शांतपणे फिजिक्स शिकवू लागले. प्रॅटीकल्स घेऊ लागलेत. चाचणी परिक्षेत मुलांना पास करु लागले.

 पाटणकरांची बायको वनिताने आजूबाजूच्या बायकांबरोबर ओळख वाढविली. मिराशींच्या घरी तिचे जाणे येणे होतेच. काही हवे असले तर मिराशींची बायको तिला द्यायची.

 संस्थेने पहिले दोन महिने पाटकरांना सहा हजार रुपयाप्रमाणे मानधन दिले. तिसरा महिना संपला चौथ्या महिन्याची दहा तारीख आली तरी पैशाचा पत्ता नाही. वनिता नवर्‍याकडे एकसारखी पैसे मागत होती. घर सामानाला पैसे हवे होते. मिराशींची उधारी चालू होती. भाजीला पैसे हवे होते. दुधाचे पैसे  द्यायचे होते. चौथ्या महिन्याची पंधरा तारीख आली तसे पाटणकर क्लार्क कोळंबकर ना भेटायला गेले.

‘कोळंबकर, अहो माझा पगार नाही दिला. आज पंधरा तारीख. मी माझा संसार कसा चालवू?’

‘अहो, पाटणकर. ह्यो सरकारचो पगार न्हय. एक तारखेक गावणारो. हेका मानधन म्हणतत. मुला जेव्हा फीचे पैसे भरतली त्यातून तुमचा मानधन.’

‘पण केव्हा मिळेल.?’

‘तुम्ही चेअरमनांका विचारा मी काय सांगू?’

दुसर्‍या दिवशी शाळा सुटल्यावर पाटणकर चेअरमनांच्या घरी गेले. तर चेअरमन सोसायटीत गेले होते. पाटणकर चौकशी करत सोसायटीत गेले. चेअरमन दोस्तांसमवेत गप्पा मारत बसले होते. पाटणकरांनी त्यांना नमस्कार केला.

‘हा काय पाटणकर इकडे कसो काय?’

‘साहेब, मागील महिन्यात पगार नाही झाला. पंधरा तारीख आली म्हणून आलो होतो.’

‘हे बघ पाटणकर, शिक्षक सेवकांचो पगार म्हणजे मानधन. एक तारखेक मिळात हेची गॅरंटी नाय. या आधी जे होते तेंका पण वेळेत कधी पैसे मिळाक नाय. मुलांकडून जसे पैसे जमतीत तसे पैसे देणार. संस्थेकडे पैसे नाहीत बाबा. नोकरी स्विकारताना विचार करायला हवा होतास तु. ’

‘पण साहेब, माझ कुटुंब…’

‘हे बघ मी काही करु शकत नाही. तु जा. ’

पाटणकर निराश मनाने बाहेर पडले. घरी येऊन वनिताला सर्व परिस्थिती सांगितली. वनिता दुसर्‍या दिवशी भावाकडे कनेडीला गेली. तिच्या भावाचे कनेडीत आणि कणकवलीत दोन सलून होती. तिने भावाला सर्व परिस्थिती सांगितली.

‘वनिता, भावोजींका सांग. तुमका पगार देनत नाय तर नोकरी सोडा आणि बर्‍यापैकी सलून घाला. मी मदत करतय. अगो, आमच्या धंद्यात काय कमी नाय. दाढी करुक आम्ही चाळीस रुपये घेतो आणि केस कापूक शंभर रुपये. एसी सलून घातला तर केस काळे करुक पाचशे रुपये घेतो आणि लोक आनंदान देतत. दिवसाचो खर्च वजा करुन दीड दोन हजार रुपये खय गेले नाय. ’

 ‘सांगतय मी तेंका. पण तेंनी शिक्षण घेतला ना. डबल ग्रॅज्युएट आसत. सासर्‍यानी मोठ्या अपेक्षेन एका झीलाक कोल्हापुराक पाठवून शिकवल्यानी. तेंका काय वाटात? वनिताच्या भावाने दोन हजार रुपये दिले आणि वहिनीने तांदूळ, गहू, शेंगदाणे, कुळीथ वगैरे दिले. वनिताला खर म्हणजे भावाकडे मागणे कमीपणाचे वाटत होते. पण नवर्‍याचा पगार सुरु झाला की दादाचे पैसे परत करु असे तिने ठरविले.

 संस्थेकडून पगाराचे असेच सुरु होते. दोन महिन्यानी सहाहजार मिळाले पुन्हा दोन महिने नाही. कसा तरी संसाराचा गाडा पाटणकर आणि वनिता ओढत होते. सरकारचे धोरण बदलेल आणि आपणास परमनंट शिक्षकाचा पगार मिळेल या आशेवर ते होते. हळू हळू दसरा, दिवाळी जवळ आली आणि वनिता च्या चुलत बहिणीचे लग्न ठरले. पाटणकरांच्या मावस भावाचे लग्न ठरले. ही तर घरातली लग्ने. लग्नाला जायला हवेच. वनिता नवर्‍याला म्हणाली, ‘आता दिवाळीत दोन लग्ना आसत. घरचीच लग्ना. दागिने जावंदे, खोटे दागिने घालूक येतत. पण कपडे तरी हवेत.

 माझे साडये जुने झालेत. दोन साड्या, ब्लाऊज, शाम्याक  दोन ड्रेस आणि लग्नाक अहेर करुक होयो. तेनी आपल्या लग्नात अहेर केल्यानी. पैशाची सोय करुक होयी. मागे  दादान पैसे दिल्यान, आता तेच्याकडे परत पैसे कशे मागतले?’

‘नको, आता दादाकडे मागू नको. मी बघतय कोणाकडे तरी.’ पाटणकरांच्या लक्षात आले. आपले दोन सहकारी आहेत. सावंत आणि जांभळे. दोघेही परमनंट आहेत शिवाय जांभळेंची बायको शिक्षिका आहे. म्हणजे पैशाचा काही प्रॉब्लेम नाही.

दुसर्‍या दिवशी त्यांनी सावंत सरांना गाठले. सावंत सरांना भेटताना त्यांच्या लक्षात आले, हे सर आता रिटायरमेंटला आले म्हणजे यांचा पगार एक लाखाच्या आजूबाजूला असणार. आपल्याला फत पाच हजाराची गरज आहे.

‘सावंत सर, माझं एक काम होतं. ’

‘होय काय. पैशाचे सोडून काही काम असेल तर सांगा.’

‘पैशाचेच होते. फत पाच हजार हवे होते. ’

‘नाय ओ. मीच कर्ज घेतलयं. त्याचे हप्ते भरतय आणि तुमच्या या सहा हजारात तुम्ही पैसे परत कशे करणार बाबा? नाही जमायचे.’

हिरमुसले होत पाटणकर बाहेर पडले. आता जांभळे सर म्हणजे नवरा बायकोचा पगार. म्हणजे किमान दीडलाख रुपये. हे नाही म्हणणार नाहीत असा पाटणकरांचा अंदाज होता.

‘जांभळे सर, थोडं काम होत. ’

‘बोला पाटणकर. ’

‘फत पाच हजाराची गरज होती. पगार झाला की तुमचे पैसे निश्चित देणार’

जांभळे सर खो-खो हसत म्हणाले, पाटणकर शिक्षण सेवक कधी कुणाचे उधार घेतलेले पैसे देतो काय हो? तुमचे महिन्याचे मानधन वेळेत मिळत नाही म्हणजे तुम्ही अनेकांकडून पैसे उधार घेतलेले असणार. मग माझे देणार कसे? मी कधीच कुणाला पैसे देत नाही. पैसे कमवण्यास घाम गाळावा लागतो. पैसे काय झाडाला लागतात?’

‘हो सर, बरोबर आहे तुमचं.’ असं म्हणून पडेल चेहर्‍याने पाटणकर बाहेर आलेत. बाहेर पडता पडता शाळेचा प्यून मोहन ने त्यांना पाहिले. मोहनला पहिल्यादिवसापासून पाटणकरांची दया येत होती. गरीबीतून हा मुलगा नोकरीस लागला तो शिक्षण सेवक म्हणून. चार वर्षे आधी शिक्षण पुरे केले असते. तर एव्हाना साठ-सत्तर हजार मिळवले असते. मोहन ने पाटणकरांना बाजूला घेतले.

‘सर, काय प्रॉब्लेम होतो?’

‘काही नाही ओ. असंच. ’

‘असंच नाही. माझ्या कानात शब्द पडलेत. या जांभळ्याकडे पैशे मागूक गेलात. अहो जांभळो म्हणजे एक नंबर चिकटो.’ किती पैसे हवेत? मी देतलय. अहो माका चाळीस हजार रुपये पगार आसा माका खर्च कसलो? किती व्हयेत सांगा. उद्या आणून देतलय.

‘कसं सांगणार तुम्हाला. पण पाच हजाराची गरज होती. ’

‘उद्या तुमका पाच हजार रुपये मिळतले. ’

आणि खरोखरच मोहन ने पाटणकरांना पाच हजार रुपये दिले आणि वर सांगितल पाटणकर हे पैसे परत करु नकात आणि तुम्ही दिलात तरी मी घेवचय नाय.

‘पण मोहनराव असा कसा?’

मोहन तेथून दुसरीकडे निघून गेला होता. पाटणकरांचे मन भरुन आले. आपले पैसे मिळाले की मोहन चे पैसे परत करायचे हे त्यांनी मनोमन ठरविले.

पाटणकरांची बायको खुश झाली. या लग्नासाठी साड्या, ब्लाऊज, मुलासाठी कपडे आणि बळेबळे नवर्‍याला पण पॅन्ट-शर्ट घ्यायला लावले.

 जानेवारी महिना उजाडला आणि अकरावी-बारावी ची सहल काढण्याच टूम निघाली. या वर्षी गोव्याला जायचे ठरले. एकंदर बावीस मुला-मुलींनी सहलीला येण्याची तयारी दाखविली. सोबत शिक्षक म्हणून पाटणकर आणि खालच्या वर्गात शिकवणार्‍या चव्हाण मॅडम जाणार होत्या. सकाळी सहा ला बस मधून जायचे आणि संध्याकाळपर्यंत परत यायचे असा कार्यक्रम ठरला. कणकवलीतून बस येणार होती. एकंदर बारा मुलगे, दहा मुली, दोन शिक्षक असे चोवीस जण सहलीला निघाले.

 पाटणकरांनी सहलीचा कार्यक्रम निश्चित केला आणि तसे ड्रायव्हरला सांगितले. गाडी साडे सहाला निघाली. गोव्यातील ओल्ड चर्च, शांतादुर्गा, मंगेशी देवस्थाने तसेच पणजी करत दुपारी तीन च्या सुमारास कळंगुट बीच वर आले. पाटणकरांनी आणि चव्हाण मॅडमनी मुलांना येथे एक तास दिला. समुद्रावरुन फिरुन चार वाजता पुन्हा बसकडे या. चार वाजता बस सुटेल असे निक्षून सांगितले. मुल-मुली खुशीत समुद्रावर धावली. पावणेचार झाले तसे पाटणकर आणि चव्हाण मॅडम बसकडे आले. चार ला पाच मिनिटे असताना मुल-मुली गाडीकडे येऊ लागली.

 चार वाजले तसा ड्रायव्हर येऊन बसला. चव्हाण मॅडमनी मुल-मुली मोजली तर वीस मुल भरली. म्हणजे दोन मुल आली नव्हती. अजून पाच दहा मिनीटे थांबून पुन्हा पाटणकर खालीपर्यंत पाहून आले. दोन मुल आली नव्हती. कोण नाही आली याची चौकशी केली तर बारावीतील एक मुलगा आणि अकरावीतील एक मुलगी आली नव्हती. पाटणकर घाबरले. पाटणकरांनी मुलांकडे आणि चव्हाण बाईंनी मुलींकडे चौकशी केली तर मुल एकमेकांकडे बघून खुसुखुसु हसत राहिली. चव्हाण बाई पाटणकरांना म्हणाल्या, काहीतरी गडबड आहे. ही मुलं गेली कुठे?

 शेवटी जबाबदारी पाटनकरांची होती. त्यांनी आपल्या जबाबदारीवर मुलांना एक तासा करिता सोडल होत. म्हणता म्हणता साडेचार वाजले तरी या दोन मुलांचा पत्ता नाही. पाटणकरांच्या घशाला कोरड पडली . काय कराव हे कळेना. त्यांनी शाळेत फोन केला आणि मुख्याध्यापकांना ही बातमी सांगितली. जोंधळे चिडले. ‘तुम्हाला मुलांना समुद्रावर मोकळ सोडायला कोणी सांगितल होत? आता काय जबाब देणार पालकांना? आता तेथल्या पोलिसांना तक्रार द्या. दुसरा काही उपाय दिसत नाही मला.’

 अस म्हणून जोंधळेंनी खाड्कन फोन आपटला.

पाटणकर घाबरले. चव्हाण मॅडम थरथरु लागल्या. कोण मुल आलेली नाहीत याची चौकशी करताना संस्थेच्या सदस्या साळगांवकर मॅडम यांची कन्या आलेली नव्हती. पाच वाजले तरी मुलं आली नाहीत. शेवटी पाटणकरांनी कळंगुट पोलिस स्टेशनला तक्रार दिली. दोघांची नावे आणि फोटो दिले. इन्स्पेटर ने जवळपास कुठल्या बिचवर सतरा-अठरा वर्षाची मुलं समुद्रात बुडाली होती काय ? याची चौकशी केली. सुदैवाने त्या दिवशी संपूर्ण गोव्यात कसलीही  दुर्घटना झाली नव्हती. मग इन्सपेटरनी कळंगुट च्या आसपास सर्व हॉटेल्स, बीअर बार , लॉजेस मध्ये फोटो पाठवून चौकशी करण्याची ऑर्डर दिली. यावेळेपर्यंत गाडीत बसलेल्या मुलांनी आपापल्या घरी ही बातमी कळविली होती. त्यामुळे गावात सगळीकडे ही बातमी पसरली. पाटणकरांना आणि चव्हाण मॅडमना फोनवर सतत फोन येत होते. पण त्यांनी ते न घेण्याचे ठरविले.

 पंधरा मिनीटांनी एका बार वाल्याचा मेसेज आला. सव्वा तीन वाजता एक मुलगा आणि एक मुली आपल्या बार मध्ये बीअर पीत बसली होती. मग ते टॅसीच्या शोधात रस्त्यावर फिरत होते. ताबडतोब शहरातील सर्व टॅसीवाल्यांची चौकशी झाली. रात्री आठ वाजता निरोप आला. एका टॅसीवाल्याने दोघांना कर्नाटक सीमेपर्यंत सोडल होत. तेथील आजूबाजूच्या लॉजवर चौकशी केली गेली आणि रात्री नऊ वाजता एका लॉज मध्ये हा मुलगा आणि मुली सापडली.

 गावात जोरदार चर्चा सुरु झाल्या. त्यात साळगांवकर बाईंची मुलगी असल्याने जास्त खमंग चर्चा. एव्हाना गावातून दहा-बारा गाड्या माणसे भरुन कळंगुट पोलिस स्टेशन कडे आल्या होत्या. साळंगावकर बाई आणि तिचा नवरा पोलिस स्टेशनमध्ये आले आणि ते पाटणकरांना शिव्या घालू लागले. रात्री अकरा वाजता पोलिसांनी त्या मुलांना कळंगुट पोलिस स्टेशनवर आले. कळंगुटच्या आमदाराच्या मदतीने सर्व प्रकरण मिटवले आणि पालकांनी मुल आपल्या ताब्यात घेतली आणि रात्री बारा वाजता सहलीसाठी बाहेर पडलेली मुलं, पाटणकर सर, चव्हाण मॅडम आणि गावाकडून आलेल्या गाड्या गावाकडे निघाल्या. पाठीमागुन साळगांवकर मॅडम, साळगांवकर आणि त्यांच्या वाडीतील अनेकजण येत होते. साळगांवकर आणि साळगांवकर मॅडम दात ओठ खात होते. अख्या गावात तोंड दाखवायला जागा नव्हती आणि हे सर्व त्या पाटकरांमुळे. साळगांवकर बाई बडबडू लागल्या. तरी मी चेअरमनांना सांगत होते. ‘त्या मुर्ख माणसाला शाळेत घेऊ नका. पण चेअरमन म्हणाले सहा हजारात या गावात कोण येणार?’

साळगांवकर, शिव्या घालत बोलू लागला. त्या चेअरमनला मग बघतो. आधी या पाटणकराला बघतो. एकतर मुलांना बीचवर एक तास सोडला आणि मग पोलिस तक्रार करतो. केवढी बेअब्रु झाली माझी. नाही या पाटणकरला ठार मारला तर नावाचा साळगांवकर नाही.

‘अहो,त्याला ठार मारु नका हा. तुरुंगात जाल. मोडून ठेवा फत. आधीच या कार्टीची मला काळजी लागली. त्या पोराबरोबर पळून जात होती. आता हीची शाळा बंद. मुंबईला ताईकडे पाठविते हिला आणि लग्न करुन देते.’

मिराशींच्या घरात पण जोरात चर्चा सुरु होती. मिराशी बायकोला सांगत होते.

 ‘त्या साळगांवकराचा पॉर लय चालू आसा. तेच्या बापाशीक मी सांगलेलय ह्या कोणाकोणाबरोबर फिरत असता. तेचा लवकर लगीन लावन टाक पण झाला ता बरा झाला. साळगांवकरनीचो तोरो जरा कमी होतोलो. नाहीतरी चेअरमनांच्या संगतीत हीका वाटा होता सगळी शाळा आपल्या खिशात.’

 एवढ्यात भयभीत झालेली पाटणकरांची बायकोवनिता आपल्या मुलाला कमरेवर मारुन आली. मिराशींना म्हणाली. ‘भावोजी, शाळेकडे माणसा जमली आसत. पाटणकरांका मोडून ठेवतलव असा बडबडतत. माका भीती वाटता. ’

 ‘वहिनी घाबरु नकात . मी कसा काय ता बघतयं. मी पण शाळेकडे जातय.’ अस म्हणून मिराशी आपल्या स्कूटरवर बसून शाळेकडे गेले. घाबरलेल्या वनिताने आपल्या भावाला कनेडीत फोन केला आणि त्याला ही बातमी सांगितली आणि साळगांवकरच्या वाडीतले लोक पाटणकरांना मारण्याची भाषा बोलत आहेत अशी बातमी दिली. भाऊ म्हणाला, वनिता घाबरू नकोस.

 मी दहा मिनिटात गाडी घेऊन निघतय.

 रात्रौ अडीच वाजता सहलीची बस शाळेकडे पोहोचली. मुलांचे पालक शाळेकडे उभे होतेच. मुल पटापट उतरली आणि आपल्या पालकांकडे गेली. पाटणकर, चव्हाण बाई उतरले. बस पाठोपाठ साळगांवकरांची गाडी आली. दारु पिऊन टाईट झालेल्या साळगावकराने कमरेचा पट्टा काढला आणि तो पाटणकरांना बडवू लागला. सर्व पालक पाटणकर पट्टयाचा मार कसा खातात याची मजा घेत होते. एवढ्यात मिराशी पुढे आले आणि साळगावकरांनी उगारलेला पट्टा त्यांनी हवेतच हातात पकडला आणि खेचून घेतला. मिराशी ओरडून म्हणाला, ‘हरामखोर साळगांवकरा, या गरीब मास्तराक मारतस? तुझ्या पोरीन शेण खाल्ल्यान आणि त्या मास्तराक जबाबदार धरतस?’

‘मग? त्याने मुलांना बीचवर का सोडल? आणि मग पोलिस तक्रार का केली?’

‘अरे, मुलं सहलीला गेली होती ना? मनासारखं फिरु दे त्यांना म्हणून सोडली. बाकीची वीस मुलं वेळेत गाडीत आली. तुझा चेडू आणि तो फर्नाडिसाचो झील तेवढे पळाले ह्या दोघांका मी देवळाच्या पाठीमागे कितीवेळा बघलय. तुका सांगलेलय ह्या चडवार लक्ष ठेव. आता पाटणकरांवर हात उचलशीत तर मुळासकट उपटून टाकीन लक्षात ठेव.’

साळगांवकर जळफळत होता. पाटणकरांना आई-बहिणीवरुन शिव्या देत होता. एवढ्यात कनेडीहून पाटणकरांचा मेहूणा दोन गाड्या भरुन माणसे घेऊन आला. पटापट दरवाजे उघडले गेले आणि हातात दांडे घेतलेले दहा जण बाहेर आलेत. पाटणकरांच्या मेहुण्याने हातात सुरा घेतला आणि पट्टा हातात घेतलेल्या साळगांवकराच्या मानेवर लावला.

‘वा रे मुडद्या , या गरीब शिक्षकावर हात टाकतस? कित्या तो शिक्षण सेवक आसा म्हणून? पैशानं गरीब आसा म्हणून? भानगडी केल्यान तुझ्या चेडवान आणि या पट्टयान मारतस या मास्तरास. थांब तुझो कोथळो बाहेर काढतय.’

पाटणकरांच्या मेहुण्याने सुरा पोटावर लावताच साळगांवकर रडू लागला. हातापाया पडू लागला. साळगांवकरांची मित्रमंडळी एवढी सगळी  दांडे हातात घेतलेली माणसे बघून पळू लागली. मिराशी पुढे झाले आणि त्यांनी मेहुण्याला थांबविले. ‘रक्तपात करु नको बाबा. पोलिस मागे लागतले. एकवेळ सोड तेका.’

मेहुण्याने सुरा बाजूला केल्या आणि साळगांवकरांच्या दोन थोबाडीत दिल्या. बरोबरीच्या साथीदारानी दांड्यानी त्याच्या पाठीवर मारले. साळगांवकर गुरासारखा ओरडू लागला. मिराशीनी दोघांना दूर केले. मग मेव्हण्याने साळगांवकरांच्या मानेला धरले आणि उचलून पाटणकरांच्या पायावर घातले. पाया पड तेंच्या. अरे डबल ग्रॅज्युएट माणूस आसा तो. शिक्षण सेवक झालो म्हणून तुमका तेंची किंमत नाय. साळगावकर लंगडत लंगडत बाजूला झाला. मग मेहुणा पाटणकरांकडे वळला. पाटणकरांची पाठ, मान, दंड रक्ताने माखले होते.

‘चला भावोजी, तुमका डॉटरकडे नेऊन मलमपट्टी करुक होयी आणि आजपासून ह्या गाव आणि ही शिक्षण सेवकाची नोकरी सोडायची. तुम्ही कितीही हुशार असलात कितीही शिक्षण घेतलात तरी तुम्ही शिक्षण सेवक झालात की तुमची किंमत शुन्य. ही असली नोकरी करण्यापेक्षा मी तुमका धंदो काढून देतय.’

 मेहुण्याने पाटणकरांना गाडीत घेतले. वाटेत बहिणीच्या घरी जाऊन घरातील सर्व सामान आणि बहिणीला आणि तिच्या मुलाला घेऊन कणकवली गाठली.

 पंधरा दिवसांनी कणकवलीत ‘पाटणकर हेअर कटींग सलून एसी’ सुरु झाला. पाटणकरांच्या मेहुण्याने आपला अनुभवी कारागिर सोबत दिला. हळूहळू पाटणकरांनी सर्व शिकून घेतले. दोन महिन्यांनी ते सलून मध्ये व्यवस्थित काम करु लागले. पाटणकर हेअर कटींग सलून ला लोकांचा चांगला रिस्पॉन्स मिळाला. एका वर्षात दुसरे सलून कणकवली स्टेशनजवळ काढले.

 आता पाटणकर मजेत आहेत. व्यवसायात चांगले पैसे मिळवत आहे. बायको -मुलगा खुष आहेत. तरीपण पाटणकरांना झोपेत आर्किमिडीज, न्यूटन येतो. स्पेट्रम थिअरी येते. सरफेस टेंशन येते आणि मग अजून आपण शिक्षण सेवक असल्याचे त्यांच्या स्वप्नात येते आणि ते घाबरतात. मग जाग आल्यावर आपण पाटणकर हेअर कटींग सलून चे मालक असल्याचे तेंच्या लक्षात येते आणि ते कुशीवर वळतात आणि ते गाढ झोपी जातात.

(शिक्षक) सेवक प्रदिप केळुसकर,
Share This Article
error: Content is protected !!
×