Sshree Astro Vastu

श्रीवल्लभेश मंगलम्

भगवान श्री गणेशाच्या शक्तींचा उल्लेख केल्या बरोबर आपल्या डोळ्यासमोर देवी सिद्धी आणि बुद्धी यांचा विचार येतो. तथापि गाणपत्य संप्रदायात श्री गणेशांच्या विविध शक्तींचा उल्लेख केलेला आहे.

     परब्रह्म परमात्मा भगवान श्री गणेश आपल्या स्वानंदेश स्वरूपात एकटे एकटे विद्यमान असतात. कधीतरी त्या परमात्म्याला अनेकत्त्वाची इच्छा जागृत होते. या इच्छेला उपनिषदांनी एकोऽहम् ! बहुस्याम् ! अशा स्वरूपात वर्णन केले.

ब्रह्मणस्पतीला अशी इच्छा झाल्यावर त्या इच्छापूर्तीसाठी ते आपल्या योगमायेला जागृत करतात. ही त्यांची योगमायाच देवी वल्लभा नावाने ओळखली जाते. ती मोरयाची अत्यंत प्रिय असल्याने तिला वल्लभा असे म्हणतात.

      एकट्याच एकटा मोरयाच्या स्वरूपात सर्व विश्वाचा आरंभ आहे.  आता या मायेचा रूपात दोन स्वरूपात नटलेला असतो. त्यामुळे या देवी वल्लभेच्या प्रगटीकरणाची, मोरयाने तिच्यासह नटण्याची तिथी चैत्र शुद्ध द्वितीया असते.

चैत्र हे आरंभाचे प्रतीक. प्रतिपदा हे एकमेवाद्वितीय निर्गुण, निराकार परब्रह्माचे प्रतीक. तर द्वितीया म्हणजे मायाशबलित, सगुण साकार परब्रह्मा चे प्रतीक.

     या स्वरूपात आपल्या योगमायेने अर्थात देवी वल्लभे सोबत विराजमान असणाऱ्या परब्रह्माला श्रीवल्लभेश असे म्हणतात.

     ही देवी वल्लभा अर्थात भगवान गणेशांची योगमाया तीन गुणांची एकात्मिक अवस्था असते. त्यामुळे हिला त्रिगुणात्मिका असे म्हणतात. तिच्या या तीनही गुणांचे संचालक असल्यामुळे भगवान वल्लभेशांना श्रीगुणेश असे देखील म्हटले जाते.

    निर्गुण निराकार त्रिगुणातीत परब्रह्म म्हणजे भगवान श्री गणेश. तर आत्ममायायुक्त सगुण साकार त्रिगुणात्मक परब्रह्म म्हणजे श्री गुणेश.

याच स्वरूपापासून पुढे पंचेश्वर निर्माण होत असल्याने यांना पंचेशजनक असे संबोधिले जाते.

       भगवान ब्रह्मदेव, भगवान विष्णु, भगवान शंकर, भगवती आदिशक्ती आणि भगवान श्री सूर्य हे पंचेश्वर या भगवान वल्लभेशां पासून निर्माण होतात असे गाणपत्य तत्वज्ञान सांगते.

या पंचेश्वरांचे निर्मितीस्थान तथा संचालक या स्वरूपात भगवान वल्लभेश दशभुज स्वरूपात वर्णिले असतात.

    त्यामुळे त्यांच्या हातात भगवान ब्रह्मदेवांचे कमळ, भगवान श्री विष्णूचे चक्र, भगवान श्री शंकरांच्या त्रिशूळ , आदिशक्तीचे धनुष्य अशा सर्व गोष्टी त्यांनी धारण केलेल्या असतात. जणू काही या सगळ्यांची शक्ती त्यांच्या हातात आहे हे सांगण्याची ती प्रतीकात्मक पद्धती असते.

   त्यासोबत मोरयाचे स्वतःचे आयुध म्हणून त्यांच्या हातात पाश असतो. तीन गुणांचे, पंचेश्वरांचे, पर्यायाने अनंत कोटी ब्रह्मांडांचे सूत्र-संचालन श्रीवल्लभेशांच्या हातात आहे हे सांगण्यासाठी तो पाश असतो.

    अशी ही देवी वल्लभा आणि तिने युक्त असणाऱ्या भगवान वल्लभेशांच्या महामीलनाचा महोत्सव म्हणजे वल्लभेश मंगलम् !

    चैत्र शुद्ध द्वितीयेला गाणपत्य संप्रदायात हे वल्लभेश मंगलम् व्रत करण्याची पद्धत आहे.  या दिवशी देवी वल्लभा आणि भगवान वल्लभेश यांचे यथाशास्त्र पूजन करावे तथा त्यांच्या विवाह सोहळ्याचा आनंदोत्सव संपन्न करावा.

श्रीवल्लभारमण स्मरण जय जय श्री गणेश !

जय श्री वल्लभेश.

Share This Article
error: Content is protected !!
×