“इथे ये. माझ्यासमोर उभी रहा.” चाबकाचा फटका मारल्यासारख्या बाई कडाडल्या.
स्वरा भीत भीत त्यांच्यासमोर जाऊन उभी राहिली. काय होतंय ते कळण्याच्या आत त्यांनी फाडकन तिच्या थोबाडीत मारली.
“बेसुरा ! कुठलीही गाढवं, माकडं येतात नि मी शिष्य म्हणून पत्करते त्यांना ! मठ्ठ कुठली ! जा. चालती हो. गाणं शिकायची लायकी नाही तुझी. पुन्हा मला तोंड दाखवू नकोस.”
बाईंनी नव्याने घोटवून घेतलेला राग गाताना कशा कुणास ठाऊक…. स्वराच्या ठिकठिकाणी चुका झाल्या आणि बाईंचा पारा चढला.
स्वरा घरी येऊन लागलीच रियाज करायला बसली. चुका सुधारून निर्दोष आणि आत्मविश्वासाने गायचं हा तिचा निर्धार होता.
दुसऱ्या दिवशी सकाळीच ती बाईंकडे पोहोचली.
“तू ? पुन्हा लोचटासारखी आलीस ? मला तोंड दाखवू नको म्हणून सांगितलं होतं ना काल ?”
” बाई, मी चुकले. आज चूक होणार नाही. मी भरपूर सराव करून आले आहे.”
” होय का ? गाऊन दाखव.”
स्वरा आत्मविश्वासाने, प्रसन्नपणे गायली. बाईंचा चेहरा निर्विकार होता. “ठीक आहे. तुला कालची चूक माफ.”
स्वरा बाईंकडे गाणं शिकायला येऊ लागली त्याला आता सताठ वर्षे झाली होती. तशी तर अगदी लहानपणापासूनच ती गाणं शिकत होती. ‘गानतपस्विनी’ म्हणून बाईचा मोठा लौकीक होता. महान, प्रतिभावान गायिका म्हणून त्यांची ख्याती सर्वदूर पसरली होती. नुकतीच कॉलेजला जाऊ लागलेली, पंधरा-सोळा वर्षांची, बाईंनी कठोर परिक्षेनंतर ‘शिष्या’ म्हणून स्वीकारलेली स्वरा ग्रॅज्युएट झाली. त्यानंतर आता पोस्ट ग्रॅज्युएशन करत होती. स्वरसाधना अखंडपणे सुरूच ! बाईंच्या स्वर्गीय स्वराने ती भारावून गेली होती. जगप्रसिद्ध असलेल्या या महान गानतपस्विनीसारखंच आपल्यालाही गाता आलं पाहिजे हा ध्यास तिला रात्रंदिवस लागून राहिला होता. बाईंचा तापट, कडक स्वभाव अंगवळणी पडला. टीकेची सवय झाली. गाताना चुका झाल्या तर जोरात केस ओढणे, थोबाडीत मारणे, कान, हात पिरगळणे या शिक्षासुद्धा अंगवळणी पडल्या. ‘चालती हो. पुन्हा तोंड दाखवू नकोस’ हे वाक्य तर अगणित वेळा ऐकलं होतं. बाई अतिशय काटेकोर. कलेच्या, साधनेच्या बाबतीत लहानशी तडजोडही त्यांना मान्य नसे.अचूकतेचा निर्दोषत्वाचा त्यांचा अट्टाहास होता. तो शिष्यांमध्ये रुजवण्याची धडपड होती.
स्वरा एम.ए. झाली. ती आणि तिची आई बाईंना पेढे द्यायला आल्या.
” छान.” बाई हसून म्हणाल्या.
“बाई, स्वराला गाणं जमतं ना आता ?”
“बऱ्यापैकी.” बाई निर्विकारपणे म्हणाल्या. स्वराला हे उत्तर अपेक्षित होते. त्यामुळे तिला काहीच वाटले नाही. तिच्या आईचा मात्र हीरमोड झाला. स्वराची साधना,तयारी आणि कमालीची प्रगती जवळून बघत असल्याने ‘स्वरा उत्तम गाते, तिची तयारी छान आहे’ हे उत्तर त्यांना अपेक्षित होते. त्यांच्या उतरलेल्या चेहऱ्याकडे दुर्लक्ष करून बाई म्हणाल्या,”मी पुढच्या महिन्यात तिचा जाहीर कार्यक्रम ठरवते आहे. तीन तासांचा. गाण्यातले जाणकार, दर्दी, काही निमंत्रित आणि इतर सर्वसामान्य रसिक. तिकीट लावून कार्यक्रम ठेवणार आहे. मी ठेवलेल्या कार्यक्रमांना नेहमीच १००% प्रतिसाद असतो रसिकांचा.
‘ बापरे ! तीन तासांचा जाहिर कार्यक्रम ? एकट्या स्वराचा ?’ तिच्या आईची छातीच दडपली. तिने तिथेच डोळे मिटून मनोमन कुलस्वामिनीची प्रार्थना केली. “हा कार्यक्रम नीट पार पडू दे गं आई. लेकीला घेऊन दर्शनाला येईन. खणानारळाने ओटी भरेन तुझी. एखाद्या गरजू बाईला यथाशक्ती दान देईन.”
खचाखच भरलेला भव्य हॉल. पीनड्राॅप सायलेन्स ! बाईंना पायाला हात लावून नमस्कार करून स्वरा प्रसन्नपणे स्टेजवर येऊन बसली आणि तिने आत्मविश्वासाने गाणं सुरू केलं.
अहाहा ! काय ते दिव्य स्वर्गीय स्वर……. काय ती तयारी…….
काय तो माहौल……
सोन्याच्या लडींसारख्या सुरांच्या रेशमी लडी अलवारपणे एकामागून एक उलगडू लागल्या. मंत्रमुग्ध झालेले, भारावून गेलेले श्रोते स्वर्गसुख अनुभवत होते. भारलेले तीन तास संपले आणि ……..टाळ्यांच्या कडकडाटाने तो भव्य हॉल दुमदुमून गेला !!! स्वराचे आनंदीत, अचंबित झालेले आई बाबा उठून उभे राहिले. तिची आई तर आनंदाने रडत होती.
वाहवा …….प्रशंसेचे उद्गार ….. शाब्बासकी……. !
गाण्याचे दर्दी रसिक बाईंना एकच गोष्ट वारंवार सांगत होते. “बाई, तुमच्या शिष्येने तर तुम्हालाही मागे टाकलं! सवाई आहे तुमच्यापेक्षा ! महान गायिका होईल.”
तासाभरानंतर तो भव्य हॉल रिकामा झाला. स्वरा, तिचे आई बाबा आणि बाई …..इतकेच जण उरले.
“स्वरा, इकडे ये. माझ्यासमोर उभी रहा.” बाई धारदार स्वरात म्हणाल्या.
स्वराच्या आई बाबांनी चमकून एकमेकांकडे पाहिलं. स्वरा बावरली. ‘बाईंपेक्षा मी सरस आहे असं सगळे म्हणत होते. ते नक्की त्यांना आवडलं नसणार ! साहजिकच आहे. बापरे ! आता त्या मला कोणती शिक्षा करतील ?’
स्वरा भीत भीत त्यांच्यासमोर जाऊन उभी राहिली.
“ये. इथे माझ्या शेजारी बस.”
“बाई, नको. तुमच्या शेजारी…..मी……” स्वरा बावचळून गेली.
” बस गं.”
“बाई, नाही ! माझी जागा तुमच्या पायाशी आहे. शिष्याची जागा नेहमी गुरूच्या पायापाशीच असते.”
“पण आज शिष्या म्हणून नव्हे. तर एक प्रतिभवान गायिका म्हणून मी तुला शेजारी बसायला सांगते आहे. ये, बस.”
स्वरा अंग चोरून बाईंच्या शेजारी बसली.
“स्वरा, आज मी धन्य झाले. तू खरोखरच माझ्यापेक्षाही छान गायलीस ! आपल्या प्रज्ञावान, प्रतिभावान शिष्यांनी इतकी प्रगती करावी की आपल्यालाही मागे टाकून पुढे जावे, आपल्यावर मात करावी, आपला पराभव करावा ही गुरुची इच्छा असते.शिष्यात् इच्छेत् पराजयम् ! ही इच्छा आज तू पूर्ण केली आहेस.”
” पराभव ? बाई, तुम्ही काय बोलता हे ! मी…..”
“होय बाळ. आपल्या शिष्यांनी आपल्याला मागे टाकले हे गुरुसाठी कमीपणाचे नाही. तर उलट भूषणास्पद आहे ! काहीही हातचे राखून न ठेवता, कलेशी कुठलीही तडजोड न करता, शिस्तीत, प्रसंगी अतिशय कठोरपणे वागून शिष्याला शिकवून तरबेज केले याची ती पोचपावती आहे. आज माझी गुरुदक्षिणा मला पुरेपूर मिळाली. आपल्या भारतात कलाक्षेत्रात मोठी गुरुशिष्य परंपरा आहे. हा वारसा आपण पुढे नेला पाहिजे. स्वरा, तू गात रहा. खूप मोठी हो. माझा तुला आशीर्वाद आहे. आणि फक्त गायिका म्हणून नव्हे तर गुरु म्हणूनही माझ्यापेक्षा सरस हो. गुरुशिष्य परंपरा पुढे चालव.”
स्वरा खाली वाकली आणि तिने बाईंच्या पायावर डोके ठेवले. तिच्या मुक्तपणे वाहणाऱ्या अश्रूंचा अभिषेक त्यांच्या चरणकमलांवर होत होता. गुरुशिष्येची जोडी धान्य झाली होती ! …… एक महान परंपरा पुढे सुरू रहाणार याची ती नांदी होती !
✍🏻 रश्मी साठे