Sshree Astro Vastu

रेशीमगाठ..!!

कालचीच  गोष्ट..!

 ” सुजय.. वसंतकाकांचा फोन होता..” हातातला  चहाचा कप खाली ठेवत सुजयचे बाबा सुरेशराव म्हणाले..वसंतकाका त्यांच्याकडे पुजेअर्चेला यायचे आणि लग्न जमवणं हा त्यांचा छंद होता..!

    बाबा.. मी सांगतो  ते काय म्हणाले असतील ते..’एक छान स्थळ आहे पुण्यातलंच..मुलगी कॉप्म्प्यूटर इंजिनिअर आहे.. स्मार्ट.. गोरी

 मोठ्या कंपनीत जॉब करतेय..सत्तर हजार पगार आहे.. आणि तिला पुण्यातलाच इंजिनिअर

 मुलगा हवाय..!”

    सुजय..कमाल आहे.. तुला कसं कळलं.? वसंतकाकांनी आता अगदी असंच  स्थळ आणलयं तुझ्यासाठी .. सरप्राइजींग..!”

    “बाबा.. मागच्या अडीच तीन वर्षांत वसंतकाकांनी माझ्यासाठी पुण्यातली अशी दहा स्थळं आणलीयत आणि माझ्या कंपनीची बडोदा आणि नासिकला मोठी युनीट असल्यामुळे  माझी  तिथे

ट्रान्स्फर होऊ शकते म्हणून बहुतेक मुलींनी आपल्याला नकार दिलाय..”

    पाठीवर लॅपटॉपची सॅक अडकवत सुजय

म्हणाला.

 

  ” आणि बाबा तीन वर्षे झाली आपण मुली बघतोय.. मला आता  कंटाळा आलाय मुली बघायचा..

मी ठरवलंय आता वर्षभर एकही मुलगी बघणार नाही.. “

 

    सुजयनं पायात आपले शुज अडकवले आणि कुणाकडेही न बघता तो कारची चावी घेऊन बाहेर

निघून गेला..

 

    सुरेशराव आणि सुमतीनं हतबुद्ध होऊन

एकमेकांकडे पाहिलं..

 

    सहा महिन्यापासून आईला सकाळी लवकर उठून स्वयंपाक करावा लागतो म्हणून दुपारचं जेवण सुजय कंपनीच्या मेसमध्ये करत असल्यामुळे सकाळचा चहा आणि नाश्ता घरी आईबाबांबरोबर करणारा सुजय आज पहिल्यांदाच चहासुद्धा न घेता बाहेर पडला होता..

कोणत्याही बाबतीत आपल्या बाबांशी चर्चा केल्याशिवाय निर्णय न घेणाऱ्या सुजयनं त्यांना हा अनपेक्षित धक्का दिला होता..!

 

    या  निर्णयानं ते सुन्न झाले होते..

 

     तीन वर्षापूर्वी सुजयला अठ्ठावीस वर्षे पूर्ण झाली  आणि सुरेशरावांनी आणि सुमतीताईंनी मोठ्या उत्साहाने सुजयसाठी स्थळ बघायला सुरुवात केली होती ..

 

     पुण्यातल्या दोन

तीन नामांकित विवाह संस्थेत सुरेशरावांनी त्याचं नाव नोंदवलं आणि सुमतीताईंनी आपल्या नातेवाईकात आणि मैत्रिणींत सुजयच्या लग्नाची माउथ पब्लिसिटी सुरू केली..

 

     आणि आठ दहा दिवसातच मुलींच्या आईवडीलांचे फोन आणि मोबाईलवर मुलींची प्रोफाईल येणं सुरू झालं..

 

     पहिल्याच महिन्यात

सुजयनं एक मुलगी पसंत केली..आशा तिचं नाव.. छान होती.. सुजयच्या अपेक्षेप्रमाणे होती आणि बाबांच्या दृष्टीने  ती माणसं पण चांगली होती..आणि त्यांची पसंतीही आली होती..

 

    “ह्या रविवारी त्यांना आपल्याकडे बोलवून

 नक्की करुन टाकू.. काय ग..?”

 सुरेशराव सुमतीताईंना म्हणाले..

 

    “अहो.. इतकी काय घाई आहे.! आत्ताच आपण मुली बघायला सुरुवात केलीय.. आणि आपल्या सुजयसारखं स्थळ शोधून सापडणार नाही..दिसायला स्मार्ट..एम एन सी मध्ये इंजिनियर..

पुण्यात फ्लॅट..वीस लाखाचं पॅकेज.. कंपनीची गाडी..!

   आणखी काय पाहिजे..! ह्यापेक्षा चांगलया मुली येतील त्याला.. आपण ह्या स्थळाला थोडं थांबायला सांगूयात..म्हणजे आपल्याला चॉईस पण राहील..

     सुमतीताईं मोबाईलवर आणखी काहीं मुलींचे फोटो न्याहाळत म्हणाल्या.

 

    सुमतीताईंचं म्हणणं तसं चुकीचं नव्हतं.. त्यांच्या बोलण्यानं सुजय काहींसा खट्टू झाला पण आईपुढे तो काहीं बोलला नाही..

 

   आणि मग आणखी स्थळ आणि मुली बघता बघता जवळजवळ वर्ष होतं आलं होतं..

  

      बाबांचा पत्रिका पाहण्याचा आग्रह आणि मुलगी आपल्याच जातीतली असावी ही अट यामुळे काहींना त्यांनी नकार कळवला होता तर काहीं मुलींनी त्याला पसंत केलं नव्हतं.!

 

   आणि ज्या मुली आल्या होत्या त्यांच्या प्रत्येकीच्या स्वत:च्या अटी होत्या..एकीला फ्लॅट सुजयच्या नावावर पाहिजे होता तर

 दुसरऱ्या  एकुलत्या एक मुलीला लग्नानंतर  तिच्या आईवडीलांकडेच रहायचं होतं..एकीनं तर चक्क सुजयचा वाकडचा फ्लॅट  तिच्या माहेराहून लांब आहे म्हणुन नकार दिला होता..!

 

   काहीं स्थळांना सुरेशराव स्वत:  एप्रोच झाले होते पण त्यांचा रिस्पॉन्स मिळत नव्हता..

 

    सुरेशरावांना आता सुजयच्या लग्नाची काळजी वाटायला लागली होती.. सुजयनं वयाच्या तिशीत

 प्रवेश केला होता..

 

    नाईलाजाने त्यांनी सुरवातीला पसंती केलेल्या मुलीच्या.. आशाच्या वडिलांना फोन लावला पण तिचं

 लग्न लगेचंच होऊन गेलं होतं आणि  त्यांच ‘सॉरी’ असं उत्तर आलं होतं..

 

   सुमतीचं आपण त्यावेळी ऐकलं नसतं तर बरं झालं असतं असं त्यांना आता वाटायला लागलं होतं..

 

    सुजय आता लग्नाच्या बाबतीत तो काहींसा निराश आणि उद्विग्न झाला होता..मुली बघायला लागून दोन वर्षे होऊन गेली होती आणि काहीही कमी  नसताना आणि योग्य कारण नसताना मुली नकार देत होत्या आणि

त्याचं लग्न होत नव्हतं..

 

    आणि मागच्या आठवड्यात झालेल्या ‘पाहण्याच्या’ एका कार्यक्रमात त्याच्या संयमाचा कडेलोट झाला होता..!

 

    बैठकीत  दोन्ही फॅमिलींची आणि मुलामुलींची पसंती झाली आणि एंगेजमेंटपुर्वी दोघांना एकमेकांच्या आवडीनिवडी आणि स्वभावाची कल्पना यावी म्हणून त्यांना दोन दिवस एकत्र फिरण्याची अनुमती देण्यात आली..

 

    सुजयला ती कल्पना आवडली आणि त्या मुलीसह.. पेमिलासह तो कॉफी प्यायला  ‘कॅफेटेरिया’मध्ये आला होता..

 

     पेमिला हाय फाय कल्चरमध्ये वाढलेली आईबापाची लाडकी मुलगी.. एमबीए झालेली..!

 

    कॉफी सीप करता करता ती सुजयला म्हणाली.. “सुजय.. मी स्ट्रेट फॉरवर्ड आणि ओपन माइंडेड आहे.. मला एक सांग..लग्नानंतर  तू तुझ्या पेरेंटसना कोणत्या ‘डस्टबीन’मध्ये पाठवणार आहेस..?

      कारण लग्नानंतर आपल्या दोघांचीच फॅमिली असणार आहे.. मला तिसरं कोणी आपल्यामध्ये नकोय..!

 

” डस्टबीन..? ” सुजय हादरला होता..

 

अरे.. वृध्दाश्रम..! माझ्या सगळ्या फ्रेंडस वृद्धाश्रमाला डस्टबीनच म्हणतात..

पमेला मोठ्यानं हसत म्हणाली..

 

    “अग पण आई वडील ही डस्टबीन’मध्ये ठेवण्याची गोष्ट आहे का..?”

    सुजयचा पारा किंचित चढला होता..

 

    “अरे.. त्यात चिडण्यासारखं काय एवढं..! नाही तरी वृद्धाश्रम हे ओल्ड्एजच्या निरुपयोगी लोकांसाठीचं असतं.. इट्स फॅक्ट..!!” पमेला डोळ्यावरचा गॉगल कपाळावर चढवत म्हणाली..

 

   “रिअली..? सुजयनं कसाबसा आपला राग आवरला आणि ” मला ऑफीसमध्ये एमस्टरडॅमचा एक अर्जंट

कॉल येणार आहे..सॉरी माझ्या लक्षात नव्हतं .” असं म्हणून  कॉफी न पिताच तो तेथुन निघून गेला होता..

 

    आईवडीलांसाठी डस्टबीन हा तिनं वापरलेला शब्द त्याच्या

जिव्हारी लागला होता..!

 

    आणि त्याक्षणी त्यानं पुन्हा मुलगी बघायची नाही हा निर्णय तडकाफडकी घेतला  आणि काल सकाळी चहाच्यावेळी आईबाबांना सांगून टाकला होता..

 

    आणि कालच आपल्या आईबाबांना न सांगता सूजयनं आणखी एक धक्कादायक निर्णय घेतला होता.. आणि त्याला कारणं होती यामिनी..!

 

     यामिनी..!!

 

  कंपनीच्या मेसची संचालिका..

 

  कंपनी दर तीन वर्षासाठी आपली मेस कॉंन्टॅक्ट बेसीसवर चालवायला द्यायची आणि मागील तीन वर्षासाठी ती मेस अविनाशने.. यामिनीच्या नवऱ्यानं चालवायला घेतली होती..

 

     दुर्दैवाने कोरोनामुळं दोन वर्षांपूर्वी अविनाशच निधन झालं आणि सत्तावीस वर्षाच्या

 नुकत्याच लग्न झालेल्या

यामिनीवर दु:खाचा डोंगर कोसळला ..

 

      तशाही परिस्थितीत यामिनीनं स्वत:ला सावरलं होतं आणि कंपनीची मेस चालू ठेवली होती..

 

     शेलाटी.. सडपातळ बांधा, गोरा रंग, मानेवर रुळणारा छानसा अंबाडा

 डाव्या डोळ्यावर कायम येणारी केसांची एक बट…!

 

   आणि त्याबरोबरच तिच्या चेहऱ्यावरच प्रसन्न हास्य बघणाऱ्याला चटकन आपलसं करायचं..!

 

      मेसमध्ये येणाऱ्या प्रत्येकाला काय हव नको

ते स्वतः बघणारी..

 त्याला पाहिजे ते स्वत: आणून वाढणारी

यामिनी सगळ्यांच्या कौतुकाचा विषय होती..

 

   आणि एके दिवशी सुजयला वाटणाऱ्या यामिनीच्या कौतुकाचं रुपांतर आपलेपणात झालं होतं..

 

    त्या दिवशी मेसमध्ये भाजी पोळीबरोबर आमटीपण होती.. आणि खमंग झणझणीत आमटी म्हणजे सुजयला

प्राणप्रिय..!

 

  सुजयनं पहिली आमटीची वाटी झटक्यात संपवली आणि वाढप्याला हाक मारली..

 इतक्यात यामिनी आली आणि वाढप्याकडून आमटीचं भांड घेऊन त्याच्या वाटीत वाढत हसून म्हणाली.. “सुजय सर..तुम्हाला

आमटी आवडते हे मला माहित नव्हतं.. आता इथून मी नेहमी करत जाईन.. आणि हो मला पण  आवडते आमटी..!”

 

    “यामिनी..आमटी छानचं झालीय.. पण कांदा उभा चिरून घातला असता  तर आणखी टेस्टी झाली असती..!”

 

   आणि त्यादिवसापासून मेसमध्ये ज्या दिवशी आमटीचा मेनू असे त्यादिवशी त्याला आमटीमध्ये उभा चिरलेला कांदा

दिसायला लागला..!

 

     आणि लांब उभ्या असलेल्या यामिनीच्या चेहऱ्यावर त्याच्याकडे बघत फुललेलं प्रसन्न हास्य त्याला मोहून टाकायला लागलं ..!

 

  त्याला वांग्याचं भरीत आवडतं हेही तिला आता माहित झालं होतं आणि तेही मेसमध्ये नेहमी होऊ लागलं होतं..

 

   आणि काल  तेच आवडतं वांग्याची भरित खाऊन तृप्त झालेल्या सुजयच्या मनात अचानक विचार येऊन गेला..

 

  आपल्याला लाखाचं पॅकेज असणारी, देखणी,

फ्लॅट नावावर करा म्हणणारी,  मॉडर्न विचारसरणीची बायको नकोय तर..  काय हवं नको ते बघणारी,  आवडीनिवडी जपणारी, त्याची काळजी घेणारी यामिनीसारखी बायको हवीय…

    दुसऱ्याच क्षणी त्याच्या मनानं कौल दिला..यामिनीलाच विचारायला काय हरकत आहे..? बघ.. ती नाही म्हणणार नाही..!

 

सुजयचं अंग नुसतं त्या विचारानंच शहारलं.. पण

विचारायच कसं..?

 

   दोन वर्षांपूर्वीच

पतिचं निधन झालेल्या  स्त्रीला असं काहीं विचारण्याची धाडस त्याच्यात नव्हतं..

 

   विचार करून त्याचं डोक सुन्न होऊन गेलं..आणि अखेर त्याला मार्ग सापडला..

 

     त्यानं आपल्या खिशातून मोबाईल काढला आणि वॉटस्अपवर मेसेज टाकला..

 

   “यामिनी..तुला हे मी विचारायच धाडस करतोय त्याबद्दल क्षमस्व.

पण राहवत नाहीय..तुझ्याशी लग्न करण्याची माझी मनापासून इच्छा आहे..

मला जशी पत्नी हवी आहे ती मला फक्त तुझ्यामध्ये दिसलीय..तुझ्या पुर्वायुष्यासह मी तुला स्विकारायला तयार आहे..

प्लीज हो म्हणं..

मी उद्या तुझ्या उभ्या चिरलेल्या कांद्याच्या आमटीची वाट पाहतोय

आणि तुझी ती आमटी म्हणजेच माझ्यासाठी तुझी संमती आहे असं मी समजेन..मी उद्याची वाट पाहतोय..सुजय.”

 

     दुसरा दिवस.. दुपारचा एक वाजला होता.. सुजय मेसमध्ये जेवण्याच्या टेबलवर बसला होता.. त्याची  सैरभैर फिरणारी नजर यामिनीला शोधत होती

पण ती काहीं दिसत नव्हती.. आणि समोर वाढलेल्या ताटात आमटीसाठी वाटी ठेवलेली पण दिसत नव्हती..

 

    अस्वस्थपणे त्यानं वाढप्याला बोलावून तिच्याबद्दल विचारलं.

 

   ” मॅडम आज येणार नाहीत घरीच आहेत.”

 वाढप्यानं उत्तर दिलं..!

 

  सुजय न जेवताच ताटावरुन उठला.. त्याचा चेहरा आता उतरला होता.. *यामिनीच्या न

 येण्याचा अर्थ तो  समजून चुकला होता..

 

    यामिनीनं त्याची निराशा केली होती..

 

   आपल्या केबीनमध्ये जाऊन तो आपल्या चेअरवर जाऊन बसला.. काहीतरी करायचं म्हणून त्यानं आपला मोबाईल स्वीच ऑन केला आणि वॉटस्अपवरचे

 मेसेज चेक करू लागला

 

  पहिल्याच मेसेज बघून तयाचे डोळे चमकले..!!

 

     तो यामिनीचा मेसेज होता…

 

   “तुमची उभ्या चिरलेल्या कांद्याची आमटी आज संध्याकाळी  तुमची घरी वाट बघतेय…!

 

    येताय ना..?”

 

     आणि  आनंदाश्रूनं डबडबलेल्या डोळयानं सुजयनं तो मेसेज पुन्हा पुन्हा वाचायला सुरुवात केली..!!

 

 कृष्णकेशव.

Share This Article
×