Sshree Astro Vastu

"पुनरावृत्ती"

दोन सिझेरीन करून डॉक्टर मुग्धा आपल्या हाताखाली काम करणाऱ्या मावशीला म्हणाल्या, “मावशी खूप भूक लागली. पटकन जेवण गरम करून द्या.”

    एका पाठोपाठ दोन बाळंतपण झाले त्यात एक थोडे क्रिटिकल. सकाळी नाष्टा सुध्दा करायला जमले नाही.

    “मॅडम तुम्ही स्वतः खूप जास्त मेहनत घेता. इतर ठिकाणी बघा, सिस्टर सगळं बघतात. गरज असेल तरच डॉक्टरांना बोलवतात.”

    “मावशी, अहो हा पेशा पत्करला तेव्हाच मनाने रुग्णांशी नाळ जोडली गेली. तीच नाळ माझ्या जगण्याची उर्मी आहे. जेव्हा प्रत्यक्ष काम करते तेव्हा तर कशाचेही भान राहात नाही.

बाळ, बाळंतीण सुखरूप आणि त्यात गोल गुटगुटीत बाळ पाहिले की वेगळेच समाधान मिळते.”

“ते तर बघतेय मी रोज. तुमच्या आईकडून आलाय हा वसा तुमच्याकडे. त्या सुध्दा तश्याच. आधी पेशंट, मग बाकी सगळं. २० वर्ष झालीत मला इथे काम करते. मॅडम तुम्ही दोन जीवाच्या आहात. त्यात दिवस भरत आले. अश्या अवस्थेत बायका आराम करतात. तुम्ही मात्र काम. त्यात खाण्यापिण्याची इतकी आबाळ, सारखी आठवण करून द्यावी लागते. चला आता पट्कन खाऊन घ्या. नाहीतर तोंडातला घास तोंडातच राहील. आणि एखादी नडलेली येईल हातापाया पडत.”

     मावशी बोलायची आणि रिक्षा दवाखान्याच्या दाराशी येऊन उभी राहायची एकच वेळ. रिक्षावाला भरभर आत आला. “मॅडम, माझ्या रिक्षात एक स्त्री आहे. एकटीच आहे. तिला खूप त्रास होत आहे. प्लिज तुम्ही आत घेऊन यायला मला मदत करा. गरोदर आहे, खूप कळवळत आहे.”

     “तुम्ही कोण?”

     “मी रिक्षावाला! त्या ताई माझ्या रिक्षात बसल्या. मला म्हणाल्या दादा शासकीय रुग्णालयात घेऊन चला. तिथे फरश्या सोई नाहीत. डॉक्टर वेळेवर हजर नसतात. त्या ताईंना खूप त्रास होत होता. मी या हॉस्पिटल चे खूप नाव ऐकून आहे म्हणून इथे घेऊन आलो.”

      डॉक्टर मुग्धा आणि मावशी दोघी पट्कन बाहेर आल्या. रिक्षावाले काकांच्या मदतीने तिला हॉस्पिटल मध्ये आणले.

     “डॉक्टर, प्लिज माझी सुटका करा ! खूप त्रास होतोय!” ती कळवळत होती. “डॉक्टर, मुलगी असेल तर तिला मारून टाका, नाहीतर घरचे मलाच मारून टाकतील.”

      “काय झाले? अशी का बोलते?”

      “अहो आधी दोन मुली झाल्या. पोरीच जन्माला घालते म्हणून घरी नुसता आकांड तांडव सुरू आहे. मुलगाच हवा म्हणून हा तिसरा चांन्स.

तसा तिसरा नाहीच. या आधी मुलीचा गर्भ म्हणून तीन वेळा गर्भपात केला.

     आता सुध्दा करायचा होता पण डॉक्टर बोलले हा गर्भपात त्यांना झेपणार नाही. त्यांच्या जीवाला धोका आहे. मग सासूबाई म्हणाल्या, ‘तिला काही झालं तर ह्या दोन कार्टी कोण सांभाळणार ? पोरी नसत्या तर… आज मेली तर उद्या दुसर लग्न करून दिलं असतं. आता या वेळी मुलगा झालाच पाहिजे. तुझ्या सोबत कुणीही दवाखान्यात येणार नाही. तुझी तू जायचे. मुलगा झाला तरच त्याला घेऊन घरी ये. मुलगी झाली तर झाल्या बरोबर फेकून दे उकिरड्यावर. कुत्रे फाडून खातात नवजात बालकाला. घरात ही ब्याद आणायची नाही.’ जोरात केस ओढून, वरून चार धपाटे घालुन सासू आणि नवरा सांगून गेले.

    मॅडम तुम्हीच सांगा, मुलगा होणं फक्त बाईच्याच हातात असते का हो ?”

       “मूर्ख आहेत. गर्भपात करायला बंदी आहे माहित नाही का त्यांना?”

      “तरीही होतात मॅडम! प्रत्येक डॉक्टर परमेश्वराचे रुप कसे असू शकणार, आणि वंशाला दिवा पाहिजे म्हणून तीन तीन गर्भपात करणारे माझ्या सासरच्या लोकांसारखे असतात. देवा लवकर सुटका कर. खूप त्रास होतोय! मुलगा होऊ दे.”

    एक जोराची कळ आली. ती भानावर आली, “मॅडम काय झाले?”

      डॉक्टरांनी मावशीला इशारा केला. गप्प बसायचं. डॉक्टर म्हणाल्या, “अगं मुलगी झाली, पण तुझी इच्छा पूर्ण झाली.”

       “म्हणजे ?”

      “म्हणजे तुझ्यावर इतके अत्याचार झाले त्यामुळे मुलगी झाल्या बरोबर गेली.”

       “बर झालं ! डॉक्टर, मला एकदा माझे बाळ दाखवाल का ?”

     तशीही ती ग्लानीत होती. अर्धवट डोळे उघडले. बाळ तिला दाखवले.

     “मावशी लगेच बाळाला घरी घेऊन, डॉक्टर शुभा, म्हणजे आईच्या ताब्यात द्या. थोडक्यात त्यांना घडलेले सांगा.”

   थोड्या वेळाने ती म्हणाली, “मॅडम मी घरी जाऊ शकते का?”

   “अग अशक्तपणा किती जाणवतो?”

    “नाही डॉक्टर, मला जाऊ द्या.”

     “बर ! थांब ! रिक्षा मागवते. पण मला सांग, तू घरी काय सांगणार?”

     “डॉक्टर, तसेही माझे बाळ गेले. मी सांगेन रिक्षातच बाळंत झाले. एका सलून वाल्याकडून ब्लेड घेऊन मीच नाळ कापली. मुलगी झाली! पण मेलेली! बाजूलाच उकिरडा होता तिथे खड्डा केला त्यात टाकून आली. वरून माती आणि कचरा ठेऊन आली.”

      “हो असच सांग ! नाहीतर तुझ्या घरचे आमच्या मागे लागतील. बिनडोक लोकांना निमित्त लागते तमाशे करायला.”

    “हो असेच सांगते.”

     मावशी रिक्षा घेऊन आल्या. तिला रिक्षात बसवून दोघी रूम मध्ये आल्या.

    “मॅडम आता या बाळाचे काय करायचे?”

     “सरांना फोन करते”. बालरोगतज्ञ असलेल्या आपल्या नवऱ्याला फोन केला. “सुजय, लवकरात लवकर हॉस्पिटल ला या! आल्यावर बोलू.”

     सोनोग्राफी करणाऱ्या डॉक्टरांना फोन केला. “डॉक्टर मृणाल, जमेल तसे लवकरात लवकर माझ्या हॉस्पिटल ला या. खूप महत्वाचे बोलायचे आहे. बाकी आल्यावर सांगते.”

    “मावशी तुम्ही घरी जा, बाळाला बघा.” हॉस्पिटलच्या मागच्या बाजूने त्यांचे घर होते. मावशी घरी गेल्या

     “आज पुन्हा बत्तीस वर्षांपूर्वी च्या घटने ची पुनरावृत्ती झाली.”

     सुजय ची वाट पाहत मुग्धा, डॉक्टर शुभा सरोदे, म्हणजे तिची आई हिने सांगितलेल्या भूतकाळात हरवून गेली.

     डॉक्टर शुभा सरोदे, माझी आई, एक नावाजलेल्या स्त्री रोग तज्ञ. नवरा मोठ्या कंपनीत इंजिनियर. मीटिंग निमित्त नेहमी फिरतीवर असायचे.

     असेच एकदा रात्री घरी परतत असताना रस्त्याच्या मध्ये कुत्रे आडवे होऊन जोरजोरात भुंकत होते. करकचून गाडीचा ब्रेक दाबला. कुत्रा रस्ता सोडायला तयार नाही. खाली उतरले. कुत्रा त्यांच्या पायाला चाटत होता. त्यांना वाटले भूक लागली असेल म्हणून ते गाडीत काही खायला आहे का बघायला गेले. बिस्कीट मिळाले. कुत्रा बिस्किटाला तोंड लावत नव्हता. पुन्हा जवळ जाऊन पँट ओढायला लागला.

      याला काहीतरी सांगायचे आहे ते समजून चुकले. तो कुत्रा त्यांच्या पँट ला धरून ओढत होता. ते त्याच्या सोबत चालायला लागले. बघतात तर काय, एक अगदी नवजात बाळ त्यांना दुपट्यात लपेटलेले दिसले. रडून रडून आणि भुकेने व्याकूळ होऊन निपचित पडले होते.

     त्यांनी त्या मुक्या प्राण्याकडे पाहिले. तो पुढचे पाय वर करुन हात जोडतो तसे जोडून उभा होता. त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते.

    इथे बुध्दी आणि मन दोन्ही असलेल्या मानवाने हा इवलासा जीव रस्त्यावर फेकून दिला आणि हा मुका जीव त्या बाळाचे प्राण वाचवण्यासाठी रस्ता अडवून बसला होता.

     तसेच त्या कुत्र्याला आणि बाळाला गाडीत टाकले. घरी आणले. डॉक्टर शुभा त्यांची वाट पाहत बाहेर फेऱ्या मारत होत्या. त्यांना नववा महिना सुरू झाला होता.

    गाडी दारात उभी राहिली. गाडीतून उतरताना हातात एक कापडात काहीतरी लपेटलेले दिसले. तिला वाटले काहीतरी गिफ्ट असावे. आज आठ मार्च, जागतिक महिलादिन. दरवर्षी प्रशांत काहीतरी सरप्राइज देत असतात.

    प्रशांत, माझे बाबा म्हणाले, “शुभा, हे घे.”

गिफ्ट घ्यायला म्हणून त्या पुढे झाल्या. दुपट्यात मलून झालेले बाळ दिसले. बघून त्यांना खूप वाईट वाटले.

     “सगळ सांगतो.” त्यांनी गाडीचे मागचे दार उघडले. म्हणाले, “शेरू उतर, तुम्हा दोघांचे घर आले.”

       शेरू हे नाव त्यांनी त्याची त्या रात्रीची बहाद्दुरी बघून मनोमन ठेवले. तो कुत्रा खाली उतरला. आपली शेपटी हलवत बाबांना चाटू लागला.

     घरात गेल्यावर बाबांनी सर्व घटना सांगितली. का कोण जाणे, अचानक त्याच रात्री डॉक्टर शुभा, म्हणजे आईच्या पोटात दुखायला लागले. कळा सुरू झाल्या. दवाखान्यात नेई पर्यंत सुध्दा त्यांना अवधी मिळाला नाही. त्या गाडीतच बाळंत झाल्या. मुलगी झाली. स्वतःच स्वतःची नाळ कापली. बाळ मात्र मृत जन्माला आले.

     “प्रशांत घरी चला. आपल्या आवारात खड्डा करून या बाळाला मूठमाती द्या. तुमच्या मांडीवर असलेले हे आपले पहिले आणि शेवटचे अपत्य.”

     “शुभा, काय बोलते तू हे?” बाबा म्हणाले.

     “प्रशांत, अहो मी एक स्त्री रोगतज्ञ. माझी सोनोग्राफी, सगळे सगळे रिपोर्ट नॉर्मल होते. अजून तीन आठवडे तरी माझी डिलिव्हरी होणं शक्य नव्हतं. पण आज अचानक असे घडले. एक मुका जीव, त्याने ह्या बाळाचे प्राण वाचवले. कदाचित हे बाळ आपल्या कडे वाढावे ही त्या वरच्याची मर्जी असावी.”

    “बरोबर बोलते तू .असेच होईल !आता हेच आपले बाळ. चल!”

      शेरु पायरीवर बसला होता. तो आज खूप दुःखात आहे असे वाटत होते. बाबा शेरु जवळ गेले. त्याच्या पाठीवरून हात फिरवला.

   “शेरु, आजची घटना तुझ्यामुळे नाही घडली. अरे हे विधिलिखित होते. कदाचित याच बाळाचे आईबाबा होण्याचे आमच्या नशिबात असेल. आता रडायचे नाही. तु आहेस ना सोबत. आता आपल्या तिघांना सांभाळायचे आहे हिला.” त्याने मान हलवून संमती दिली.

      जसे कळायला लागले. तसे डॉक्टर शुभा, माझी आई, यांनी  मला सांगितले ‘आम्ही तुझे आईबाबा नाही.

तु तुझ्या बाबांना रस्त्याच्या कडेला सापडली. या शेरू मुळे तु वाचली, आमच्या आयुष्यात आली.’

     मी म्हणायचे “तू माझी आई नाही ना? मी रस्त्यावर सापडली ना? मग मी तुला आई म्हणणार नाही आणि यांना बाबा सुध्दा म्हणणार नाही.”

     ती म्हणायची, “तुला जे म्हणायचे ते म्हण! त्याने तुझ्या आणि आमच्या नात्यात काहीच फरक पडणार नाही. तु माझी आणि प्रशांतची मुलगी आहे. आमच्यासाठी हेच सत्य आहे.”

      मी त्या दोघांना डॉक्टर शुभा आणि मिस्टर प्रशांत म्हणायचे. तेव्हा शेरू माझ्या पायात येऊन काहीतरी सांगत असायचा. नकाराची मान हलवत असायचा.

     मोठी झाले, शेरू ला समजून घ्यायचा प्रयत्न करत होते. त्याची मुकी भाषा मला समजत नव्हती. एक दिवस अभ्यास करीत असताना एक कविता म्हणत होते. आईवर कविता होती. आई आणि मुलीचा फोटो होता. मी कविता म्हणताना जसे ‘आई’ म्हणाले तसा शेरू उभा राहून टाळ्या वाजवत होता.

     कविता म्हणून झाली. त्याने तोंडात पुस्तक धरले. आईच्या चित्रावर सारखा पंजा मारत होता. मी त्याच्या पाठीवरून हात फिरवला. “काय झाले शेरू? आईची आठवण आली का?”

     त्याने नकारार्थी मान हलवली. पुन्हा आईवर पंजा मारला.

    “‘आई’ चे काय शेरू?”

     मग डॉक्टर शुभा यांच्या फोटो जवळ जाऊन उभा राहिला. “ह्या डॉक्टर शुभा आहेत शेरू.”

      त्याने नकारार्थी मान हलवली. पुन्हा पुस्तकातल्या आईला पाहू लागला. डोळ्यात पाणी होते. आई! आई!

      “काय? शेरू खर सांग, मी डॉक्टर शुभा यांना आई म्हणावं असं तुला वाटते का?”

   शेरू जोरजोरात आनंदाने उड्या मारू लागला. माझ्या हातापायाला आपले अंग घासू लागला.

     “शेरू, तुझी इच्छा आज पूर्ण करते. खरंतर मलाही त्यांना आईबाबा म्हणावेसे वाटते. पण माझाच इगो आडवा येतो.”

    आज ठरवले, डॉक्टर शुभा हॉस्पिटल मधून घरी आल्या की तिला आवडते तशी कॉफी करून द्यायची. तिला आई आणि प्रशांत ला बाबा म्हणून हाक मारायची.

     डॉक्टर शुभा घरी आल्या. खूप थकल्या होत्या. सोफ्यावर टेकून डोळे मिटून शांत पडल्या होत्या. मी हळूच किचन मध्ये गेले. घट्ट, भरपूर कॉफी घालून आणि कमी साखर अशी कॉफी केली. मी दारा आडून “आई” अशी हाक मारली.

      डॉक्टर शुभा इकडे तिकडे पाहू लागल्या. कोणीच नव्हते. त्यांनी “मुग्धा” अशी हाक मारली. उत्तर आले नाही!

      मी पुन्हा “आई” अशी हाक मारली.

      त्या “मुग्धा, मुग्धा” करून आवाज देत होत्या.

     शेरू त्यांच्या जवळ येऊन बसला. “शेरू मुग्धा कुठे गेली?

मला सारखा तिच्या आई अशी हाक मारल्याचा भास का होतो.”

     तेवढ्यात मी कॉफीचा मग आणि पाणी घेऊन आले. टेबल वर ट्रे ठेवला.

आईच्या डोक्यावरून हात फिरवला.

“आई खूप थकली ना गं! पाणी घे!आणि हो, ही गरम गरम कॉफी पी !

अगदी तुला आवडते तशी!”

       डॉक्टर शुभा आपल्या लेकीचे हे रूप डोळ्यात साठवत होत्या. “काय म्हणालीस तू? पून्हा म्हण!”

     “आई म्हणाले. आई!”

     त्या उठल्या आणि कडकडून मिठी मारली. “मुग्धा! माझी मुग्धा! माझे गुणी बाळ!” इकडून तिकडून माझी पापी घेत होती.

     “सॉरी आई! खूप चुकले मी!”

     “नाही ग बाळा! तुझं ते वयच तसे होते! खरतर माझेच चुकले. मी तुला ‘तू आमची मुलगी नाही’ हे सांगायलाच नको होते.”

     “नाही आई, बरे झाले तू सत्य सांगितले. मला चांगल्या वाईटाचा विचार करायला अवधी मिळाला.

आपले मूल आपले म्हणून वाढवणे खूप सोपे आहे. परंतु रस्त्याच्या कडेला सापडलेले मुलं आपले म्हणून वाढवणे इतके सोपे नाही. त्यासाठी तुझ्या आणि बाबांसारखे हृदय असावे लागते. आई खरच सॉरी ! खूप दुखावले मी तुम्हा दोघांना.”

      “मुग्धा, आम्ही तुला वाढवले. त्यामुळे तुझा स्वभाव कळला होता.

आम्हा दोघांना खात्री होती. तू नक्की मला आई आणि ह्यांना बाबा म्हणून हाक मारशील. हा आहे ना तुझा गॉड फादर तुला मार्गदर्शन करायला, काय शेरू!”

      शेरू आईच्या पायाला चाटत होता. त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू होते.

       त्या दिवशी त्या खऱ्या अर्थाने माझी आई झाल्या, माझ्या नजरेतून.

आज नेमके प्रशांत, म्हणजे बाबा घरी लवकर आले. मी आईला इशारा केला. ‘तू बस, मी कॉफी करुन आणते.’ मी कॉफी करून आणली.

      “बाबा ! कॉफी!”

      बाबा माझ्याकडे मंत्रमुग्ध होऊन माझे वेगळेच रूप न्याहाळत होते. बाबा या हाकेची ते किती वर्षापासून आतुरतेने वाट पाहत होते कोण जाणे?

त्यांच्या तोंडून “मुग्धा” आणि मी “बाबा ! माझे बाबा !” म्हणत त्यांना मिठी मारली.

     मी फक्त “सॉरी आई! सॉरी बाबा !”

इतकेच म्हणत होते. आई, बाबा दोघांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते.

शेरू तिघांना अंग घासत आपला आनंद व्यक्त करत होता.

    त्या दिवशी पासून फक्त आई, बाबा साठी जगले. मी आईसारखी स्त्रीरोगतज्ञ होऊन तिचे हॉस्पिटल सांभाळावे ही त्यांची इच्छा पूर्ण केली. सुजय सारख्या हुशार आणि समंजस बालरोगतज्ज्ञ डॉक्टर सोबत लग्न झाले.

     सुजय एकटाच होता. तो लहान असताना त्याचे आईवडील दोघेही वारले. मामा कडे लहानाचा मोठा झाला. ‘पैसे नव्हते म्हणून आईबाबांना  डॉक्टरकडे घेऊन जाऊ शकलो नाही. त्यासाठी आपण डॉक्टर व्हायचे’ हे त्याचे बालपणीचे स्वप्न. स्कॉलरशिप घेऊन शिक्षण पूर्ण केले. नियतीने मुक्या जीवांचे प्राण वाचवण्याचे वरदानच त्याला बहाल केले होते.

      बाहेर सुजय च्या गाडीचा हॉर्न वाजला. डॉक्टर मुग्धा भानावर आल्या.

     “मुग्धा काय झाले? इतक्या तातडीने का बोलवून घेतले?”

     “सुजय आत चला. एक मुलगी आताच एका बाईला नकोशी झालेली. बाळंतपण मीच केले. पण तिला मुलगी नको होती. त्यामुळे तिला मृत जन्मली म्हणून सांगितले. मी जर असे नाही सांगितले असते तर तिने त्या बाळाला माझ्या सारखेच रस्त्यावर फेकून दिले असते.”

     “काय?”

     “होय सुजय!”

     तेव्हढ्यात डॉक्टर मृणाल आल्या.

“मुग्धा, इतक्या तातडीने का बोलवून घेतले?”

    “घरी चला, सगळे सांगते. आई, सुजय, डॉक्टर मृणाल आणि मावशी, मी काय सांगते ते नीट ऐका. मला डिलिव्हरी साठी जवळ जवळ १५  दिवस बाकी आहेत. माझ्या पोटातील गर्भाची वाढ देखील व्यवस्थित आहे. तर आपण पुढच्या आठवड्यात माझे सिझर करू.  हे बाळ तसे अशक्त आहे. आठ दिवसांनी सुध्दा ते नुकत्याच जन्मलेल्या बाळा सारखे दिसेल.

   डॉक्टर मृणाल, तुम्ही फक्त एकच सांगायचे, यांना जुळे होते. सर्वांना सरप्राइज म्हणून आम्ही कुणालाही काही सांगितले नाही. फक्त डॉक्टर सुजय यांना कल्पना दिली होती.

       डॉक्टर मृणाल, मी हा निर्णय घेतला कारण मी सुध्दा डॉक्टर शुभा आणि प्रशांत यांची मुलगी नाही.”

     “काय?”

     “हो! रस्त्याच्या कडेला फेकून दिलेले बाळ त्यांनी आपले म्हणून वाढवले. माझ्यावर उत्तम संस्कार केले. आज मी माझ्या आईसारखी एक नावाजलेली स्त्रीरोगतज्ज्ञ आहे. माझ्या आईबाबांचा मला खूप अभिमान आहे. कदाचित आई सारखीच परीक्षा देव माझी घेणार असेल. मला हे बाळ माझे आणि सुजयचे म्हणून वाढवायचे आहे. डॉक्टर मृणाल, प्लीज तुमच्या वर सगळं अवलंबून आहे.

   “सुजय बरोबर बोलते ना मी.”

   “मुग्धा, तुझा निर्णय तोच माझा. मी कायम तुझ्या सोबत आहे.”

     “मी उद्या पासून पूर्ण वेळ या बाळाला देणार. डॉक्टर मीनाक्षी यांना उद्यापासून हॉस्पिटल सांभाळायची जबाबदारी सोपवते. मावशी, तुमची जबाबदारी वाढणार आहे. तुम्हाला हॉस्पिटल आणि घरी मला मदत करावी लागेल. तुम्ही माझ्या आईच्या अगदी विश्वासू मावशी.”

     “मॅडम, तसेही माझ्या मागे काहीही पाश नाही. तुम्हाला काही हरकत नसेल तर मी इथेच राहायला येते. रात्री अपरात्री बाळ रडले तर मी सांभाळेल. तुम्हाला विश्रांतीची गरज आहे.”

      मुग्धा मावशी ला म्हणाल्या, “बरोबर बोलतात. मावशी या तुम्ही इथेच राहायला.”

      “मुग्धा, खूप योग्य निर्णय घेतला बाळा. मला आणि प्रशांतला तुझा आणि सुजय चा खूप अभिमान वाटतो.”

    “आई, अभिमान तर मला तुझा वाटतो गं! स्वतःचे बाळ गेल्यानंतर एका रस्त्याच्या कडेला सापडलेल्या बाळाचे संगोपन केले. डॉक्टर बनवले. इतकंच नाही तर सुजय सारख्या अनाथ मुलाला जावई करून मुलाचे प्रेम दिले. आई, तुझ्या आणि बाबांकडून खूप शिकण्या सारखे आहे.”

      “खूप झाले आई बाबांचे कौतुक. आता मी काय सांगते ते ऐक. डॉक्टर मीनाक्षी सोबत मी सुध्दा हॉस्पिटल ला जाणार आहे उद्यापासून. तुझे सिझर डॉक्टर मीनाक्षी नाही तर डॉक्टर शुभा करतील.”

     “काय? आई खरच!”

     “हो ! तीन वर्ष झाले मी माझी प्रॅक्टिस सोडली. पण मी आता ठणठणीत बरी आहे. माझ्या लेकीसाठी पुन्हा एकदा घेईन हातात शस्त्र. दुसऱ्या डॉक्टर तुझे सिझर करतील, पण तुला जुळे झाले नाही हे त्यांना समजेल. अडचणीत येऊ शकतो. डॉक्टर मृणाल यांना ओळखते मी, त्या याबद्दल कधीच कोणाला काही सांगणार नाही.”

     “मुग्धा, आई बरोबर बोलतात. त्यामुळे तुझे गुपित हे गुपित राहील. तुझ्या जुळ्याची कल्पना सत्यात उतरवायला त्यांनीच तुझे सिझर करावे. डॉक्टर शुभा, तुमच्या चरणी नतमस्तक व्हावे इतके मोठे कर्तुत्व आहे तुमचे. ‘पेराल ते उगवते’ हे अगदी सत्य आहे. डॉक्टर शुभा, तुम्ही पेरलेल्या संस्काराचा वटवृक्ष झालेला बघून खूप अभिमान वाटतो. मुग्धा, सुजय “hats of to you” and All the best.”

*©®

      लेखिका सौ. प्रभा कृष्णा निपाणे

Share This Article
error: Content is protected !!
×