“आज्जी….तुला एक खतरनाक news सांगतो.” …नीरज कॉलेजमधून आल्या आल्या आजीला म्हणाला. आई बाबा दोघेही नोकरी करत असल्यामुळे दिवसभरातल्या सगळ्या गमती जमती तो आजीलाच सांगायचा. आजीही त्याच्याच वयाची होऊन, तितक्याच उत्साहाने सगळं ऐकायची.
“अगं उद्या ना कुठल्यातरी फिल्मसाठी आमच्या कॉलेजमध्ये ऑडिशन आहे. तन्मय देणार आहे ऑडिशन. मी पण देऊ का त्याच्याबरोबर ? त्याच्यासारखीच मला पण छोटी मोठी कामं मिळाली तर मज्जा येईल ना ?”…नीरजने धडाधडा सांगितलं.
“श्रेयान्स्वधर्मो विगुण: परधर्मात्स्वनुष्ठितात् |
स्वधर्मे निधनं श्रेय: परधर्मो भयावह: ||”
उत्तरादाखल आजीने हा श्लोक म्हणला.
” माझ्या प्रश्नाचं हे कसलं उत्तर ?आता याचा काय अर्थ आहे? ” ..नीरजने न कळून विचारलं.
” याचा अर्थ स्वत:चा धर्म गुणरहित किंवा क्लेषकारक असला तरी तो सोडून परधर्म स्विकारणे हे भयावह आहे.” …आजी म्हणाली.
” आता माझ्या ऑडिशनला जाण्याचा आणि धर्माचा काय संबंध ?” …थोडं वैतागून नीरजने विचारलं.
“अरे वेड्या, इथे धर्म याचा अर्थ हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन असा नाहीये. आता तू विद्यार्थी आहेस. तेंव्हा ‘व्यवस्थित लक्ष देऊन विद्या मिळवणे’ हा तुझा स्वधर्म आहे. तन्मयचं शिक्षण झालय आणि या कलाक्षेत्रातच त्याला करिअर करायचं आहे म्हणून त्याने ऑडिशन देणे योग्य आहे. तो त्याचा स्वधर्म आहे. पण तुझं तसं आहे का ? तू सी.ए. करतोएस. त्याकडे दुर्लक्ष करून तन्मय सारखं वागायला गेलास तर धड सीए नाही धड ॲक्टिंग नाही अशी गत होईल. इथे ॲक्टिंग हा तुझ्यासाठी परधर्म आहे. “
“हे भारी आहे गं आजी ! हा कुठला श्लोक काढलास मधूनच?”
“अरे भगवद्गीतेतला श्लोक आहे हा. आपण कसं वागावं हे गीता अगदी छान सांगते.”
“अजून सांग ना काहीतरी.”…नीरज उत्सुकतेने म्हणाला.
“तुला चौगुले यांचा रोहन माहिती आहे ना ? कॉलेजमध्ये असताना मित्रांच्या संगतीने त्याला तंबाखूचं व्यसन लागलं. त्याच्या आई-वडिलांनी, नातेवाईकांनी किती समजावलं. पण त्याने कोणाचंही ऐकलं नाही. एका क्षणी त्याला सुबुद्धी झाली आणि तंबाखू खाण्याचे परिणाम बघून त्याने तंबाखू खाणं सोडून दिलं.
गीतेतला हा श्लोकसुद्धा अजून वेगळं काय सांगतोय ?
‘उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत् |
आत्मैव ह्यात्मनो बन्धुरात्मैव रिपुरात्मन: ||’
स्वतःचा उद्धार स्वत:च करून घ्यावा लागतो. स्वतःला कधीही अधोगतीला जाऊ देऊ नये. कारण मनुष्य स्वतःच स्वतःचा मित्र आहे आणि शत्रू देखील आहे. दुसरं कोणीही त्याच्या उद्धारासाठी किंवा अध:पतनासाठी कारणीभूत नसतं. रोहनने ही कोणाचंही न ऐकता, स्वत:च स्वत:चा शत्रू बनून तंबाखूचं व्यसन लाऊन घेतलं. पण परिणामांची जाणीव होताच, स्वत:च स्वत:चा मित्र बनून त्यातून बाहेरही आला.”
“माझ्या साठी आणि रोहनसाठी एकेक श्लोक सांगितलास. आता आई बाबांसाठी पण सांग. सारखे भांडत असतात.”…नीरजने आजीची परिक्षा घेण्यासाठी विचारलं.
आज्जीही काही कमी नव्हती.
“अरे तुझ्याच आई बाबांसाठी कशाला ? हा श्लोक तर प्रत्येकाने लक्षात ठेवायला हवा.
क्रोधाद्भवति सम्मोह: सम्मोहात्स्मृतिविभ्रम: |
स्मृतिभ्रंशाद् बुद्धिनाश: बुद्धिनाशात्प्रणश्यति ||
रागामुळे अविचार उत्पन्न होतो. त्यामुळे स्मरणशक्ती भ्रष्ट होते. स्मरणशक्ती भ्रष्ट झाली की बुद्धीचा नाश होतो आणि बुद्धीचा नाश झाल्यामुळे माणसाचा अध:पात होतो.”
“रागामुळे स्मरणशक्ती नष्ट होते ? काहिही काय गं आजी !” …नीरज टवाळपणे हसत म्हणाला.
आजीही हसतच म्हणाली, “बघ हं ! परवा तुझ्या मोठ्या बहिणीने काही कामानिमित्त तुझा मोबाईल, तुला न सांगता वापरला. तेंव्हा तू केवढा चिडला होतास. तिला वाईट वाटेल असं बोललास. पण तू लहान असताना, तिचाच मोबाईल घेऊन कायम त्यावर गेम खेळत असायचास , हे तू त्यावेळी विसरलासच ना ? एखाद्या वेळी घेतला तिनी तुझा मोबाईल तर काय बिघडणार होतं ? पण या भांडणातूनच दिवसभर तुम्ही एकमेकांशी बोलत नव्हतात. अशा रागातूनच तर वाद विकोपाला जातात, गैरसमज निर्माण होतात आणि एखादं सुंदर नातंसुद्धा संपुष्टात येऊ शकतं. हो की नाही ?”
“आज्जी ! या श्लोकांचा अर्थ एवढा डीप आहे असं नव्हतं वाटलं. केवढी फिलॉसॉफी भरलीये तुझ्या भगवद्गीतेत ?” …नीरज मनापासून म्हणाला.
“तुझी भगवद्गीता म्हणजे ?”…आज्जीने विचारले… “भगवद्गीता सगळ्यांचीच आहे. फक्तं कोणी विचारपूर्वक त्याचा अभ्यास करत नाही. बहुतांशी लोक ती उघडूनही बघत नाहीत. बरेच जणं ती पाठ करतात. पण त्यामागचं तत्वज्ञान मात्र जाणून घेत नाहीत आणि अमलातही आणत नाहीत.
आणि नुसतच तत्वज्ञान नाही बरं ! भगवद्गीता सायन्सही शिकवते. “
“हे मात्र काहीतरीच बोलतीयेस तू हं आज्जी !”….नीरज अविश्वासाने उद्गारला.
“बघ हं !”…आज्जी तिचा मुद्दा मांडू लागली. “सायन्स काय म्हणतं की ह्या विश्वात सगळीकडे एनर्जी आहे. एनर्जी कधीही नष्ट होत नाही. तिचं स्वरूप तेवढं बदलतं. आता हे दोन श्लोक वाच…
‘न जायते म्रियते वा कदाचित्
अयं भूत्वा भविता वा न भूय: |
अजो नित्य: शाश्वतोsयं पुराणो
न हन्यते हन्यमाने शरीरे ||’
म्हणजे, हा आत्मा कधीही जन्मत नाही आणि मरतही नाही. कारण हा जन्म नसलेला नित्य, सनातन आणि प्राचीन आहे. शरीर मारले गेले तरी हा मारला जात नाही.
‘वासांसि जीर्णानि यथा विहाय
नवानि गृह्णाति नरोsपराणि |
तथा शरीराणि विहाय जीर्णानि
अन्यानि संयाति नवानि देही ||’
याचा अर्थ, ज्याप्रमाणे माणूस जुनी वस्त्रे टाकून देऊन नवी वस्त्रे घेतो, त्याचप्रमाणे आत्मा जुने शरीर टाकून, दुसऱ्या नव्या शरीरात जातो.
माणूस जेंव्हा मरतो, तेंव्हा शरीर तर तेच आणि तसच असतं. आतली चेतना किंवा एनर्जी निघून जाते. त्यालाच तर भगवद्गीतेत आत्मा म्हणलं आहे.
आता फिलॉसॉफी आणि सायन्स दोन्हीची उदाहरणं सांगितली. पण तुला गंमत माहिती आहे का ?”
“कसली गंमत आज्जी ?”…आज्जी अजून नवीन काय सांगतीये या उत्सुकतेने नीरजने विचारलं.
” तुला तर माहीतच आहे की अर्जुन युद्धासाठी तयार नव्हता. एखादं कार्य, माणूस आधी मनाने हरतो आणि नंतर खरंखुरं हरतो. त्या अवघड वेळी, हा गीतेतला उपदेश भगवान श्रीकृष्णांनी त्याला केला. या धर्म युद्धासाठी त्याच्या मनाची तयारी करून त्याला युद्धासाठी सज्ज केले. म्हणजे आजच्या भाषेत, भगवान श्रीकृष्ण हे आपल्याला माहीत असलेले पहिले motivational speaker झाले की नाही ?”
“अरे हो ! असा विचार मी कधीच केला नव्हता आज्जी. “किती भारी आहे भगवद्गीता ! तुझ्या आग्रहावरून, मागे मी बारावा अध्याय पाठ करण्याबद्दल मित्रांशी बोललो होतो, तेंव्हा ते मला हसले होते. म्हातारा झाला आहेस का, असं चिडवलं सुद्धा त्यांनी. पण आता मी हे सगळं त्यांना ऐकवणार आहे. आयुष्यात कसं वागावं हे ज्ञान आयुष्याचा शेवट आला की कळून काय उपयोग आहे? मी आजपासूनच रोज थोडा वेळ भगवद्गीता समजून घ्यायचा प्रयत्न करेन. तू मदत करशील ना मला ?” …नीरज मनापासून म्हणाला.
“म्हणजे काय ? करणारच मदत !”…आजी हसून म्हणाली. एवढा वेळ गप्पा मारण्याचा तिचा उद्देश यशस्वी झाला होता. तिच्या परिचयातल्या आणखी एकाने आज उत्सुकता दाखवली होती. आज अजून एक पाऊल पुढे पडले होते…..
©® मेधा नेने