Sshree Astro Vastu

हिरे हे मोठमोठ्या कारखान्यात तयार होत नसून कोळशाच्या खाणीत सापडतात

हिरे हे मोठमोठ्या कारखान्यात तयार होत नसून कोळशाच्या खाणीत सापडतात. त्यांना फारतर पैलू पाडून आकर्षक बनवण्याचे काम हे कारखाने करु शकतात.

सुखवस्तू वर्गातील सर्व सुविधा बोटाच्या इशाऱ्यावर उपलब्ध असलेल्या संपन्न परिवारातील मुलं मोठमोठ्या बॅनरच्या, राजस्थान मधील कोटा येथील लाखो रुपये फी आकारणाऱ्या व डॉक्टर इंजिनिअरींग च्या शिक्षण प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या गुणांच्या शिकवण्या लावूनही यशाची खात्री नसलेल्या परिस्थितीच्या विपरीत काही अगदी सामान्य परिस्थितीतील कष्टकरी कुटुंबात अभावात वाढलेली परंतु परिस्थितीची गांभिर्याने जाणीव असलेल्या विद्यार्थ्यांनी महागडी फी परवडणार नाही म्हणून प्रचंड मेहनत घेऊन स्वकष्टाने अभ्यास करत यशश्री खेचून आणल्याचीही उदाहरणे सामाजिक माध्यमांमुळे आता जगजाहीर होऊ लागली आहेत. अशा यशस्वी विद्यार्थ्यांनाही प्रसिद्धी मिळायला हवी ती फक्त प्रसिद्धीसाठी नाही तर त्यांचे पासून इतरांनीही प्रेरणा घ्यावी यासाठी. अशा होतकरू पण परिस्थितीमुळे पायबंद लागू शकणाऱ्या मुलांसाठी सरकारने किंवा सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन त्यांना शिक्षणासाठी हातभार लावला तर त्यांचे व पर्यायाने देशाचे ही सुंदर भविष्य साकार होईल.

       भल्या पहाटे माझ्या मुलीला, डॉ. प्राप्ती ला व माझ्या आईला शिर्डीला सहा वाजताच्या भुसावळ एस. टी. बसने जळगावला जाण्यासाठी सोडवून परत माघारी श्रीरामपूरला निघालो.

        पहाटेची वेळ होती. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे एकदम मस्त आल्हाददायक वातावरण होते. आदल्या तीन दिवस आधीच जवळ जवळ एक हजार किलोमीटरच्या आसपास एस.टी. प्रवास झालेला होता. प्रवासात नेहमी मला कोणी न कोणी असामान्य व्यक्तिमत्त्व नक्कीच भेटते… परंतु पूर्ण प्रवासात असा कोणीच भेटलेला नव्हता.

       आपली २००६ साल ची मारुती व्हॅन घेऊन राहता च्या चौफुलीवर गाडीचा वेग कमी केला आणि तिथेच एका १९ ते २० वर्षाच्या तरुणाने मला थांबण्यासाठी हात केला. त्याला पाहून आपसूक माझा पाय ब्रेक वर अलगद गेला.

       रस्ता पूर्णपणे मोकळा होता तिथेच हा मुलगा उभा होता. उंचापुरा, सडपातळ शरीरयष्टी, निमगोरा, उभट चेहरा असलेला, हलकीशी कोवळी दाढी चेहऱ्यावर असलेला, हॅवरसॅक पाठीमागे लटकावलेली, कानात अगदी साध्या पद्धतीच्या हेड फोन चे बोळे अडकवलेले, चेहरा मात्र प्रचंड आकर्षक असलेल्या या तरुणाला बघून त्याच्या जवळच मी गाडी थांबवली.

       त्याने एक स्मित हास्य दिले. माहीत नाही तो किती वेळेपासून इथं असा एकटाच उभा राहिला असेल, ही जाणीव ठेवूनच थांबलो आणि त्याला पुढील सीट वर बसायला सांगितले. विनम्रपणे तो ‘थँक्यू’ म्हणायला विसरला नाही…

श्रीरामपूरच्या दिशेने आमचा प्रवास सुरु झाला. सकाळच्या मस्त वातावरणात त्या गार हवेचा आनंद घेत सहज मी त्याच्याकडे बघितले. तसा तो हळुवार हसला. मी त्याला विचारले “कुठे जायचे आहे?”

      तो म्हणाला “बाभळेश्वर.”

      मी म्हटलं, “तिथेच की अजून कुठे,”

      तो म्हणाला “मला ममदापूरला जायचे आहे.”

     मी म्हटलं, “अरे वा! रस्त्यातच आहे. सोडतो मी तुला.” पुढे अजून विचारले, “तिथं कुठं राहतो?”

      तो म्हणाला “माझे वडील येतील मला घ्यायला.”

      मी म्हटलं “कुठून…” उत्तर आले “वाकडी तुन”

      मी त्याला म्हटलं “मग आपण अस्तगाव मधून जाऊ. तिथे वाकडी चौफुलीलाच तुला सोडतो.” त्याच्या चेहऱ्यावर आनंद पसरला.

       गाडी ने मस्त वेग घेतला होता, मी मध्येच विचारले, “आता कुठून आलास?”

     तो म्हणाला “लातूर हून…” असे म्हणताच “लातूर हून का बरं?”

      तो म्हणाला, “माझा सत्कार होता लातूरला. मोटेगावकर सरांनी सत्कार केला.”

      माझ्या कपाळावर विस्मयकारी आठ्या आल्या आणि पुन्हा उत्सुकता ताणून राहिली म्हणून विचारले, “कसला सत्कार?”

      तो म्हणाला “ते नीट परीक्षेत मला ५९२ मार्क्स पडले म्हणून!”

      मला तर आश्चर्याचा धक्काच बसला… भले भले कितीतरी मुलं कष्ट, पैसा खर्च करून या ‘नीट’ च्या अति अवघड परीक्षेत यशस्वी होत नाही अन् या बहाद्दराने तर कमालच केली होती. मी अक्षरशः वेग कमी करून गाडी साईडला थांबवली आणि पुन्हा त्याला विचारले, “किती मार्क्स?”

 

      तो उत्तरला “५९२ मार्क्स.”

      मी आश्चर्याचा सुखद धक्का पोहचल्यागतच त्याच्याशी मनोभावे हस्तांदोलन केले व त्याचे अभिनंदन केलें. मनात म्हटलं ‘अरे! हा तर टॉपच्या गव्हर्मेंट कॉलेजला डॉक्टर डिग्री घेणारा भावी विद्यार्थी आहे… माझ्या व्हॅन मध्ये पहिल्यांदाच ‘नीट’ मध्ये इतके मार्क्स पडलेला भावी डॉक्टर विद्यार्थी बसलेला होता.

      आता मी त्याची विचारपूस करायला सुरुवात केली. त्याने त्याचे नाव विनायक विठ्ठलराव एलम असे सांगितले. वडील विहीर खोदकामाच्या ट्रॅक्टर वर ब्लास्टींग चे अतिशय जोखमीचे काम करतात असे तो म्हणाला. त्याची मोठी बहीण, तिलाही दहावीला ९७.७०% मार्क्स मिळाल्याचे त्याने सांगितले, तीने ही Msc (maths) केले आहे आणि दोन नंबर ची बहीण इंजिनिअरिंग करून MPSC ची पहिली परीक्षा पास झाल्याचे सांगितले.

       तो सांगत होता आणि मी फक्त आणि फक्त ऐकतच होतो… एका मागून एक शैक्षणिक धक्के मला बसत होते… मी विचारले “तुझ्या वडिलांचे शिक्षण ते किती ?”

      तो म्हणाला “पाचवी. आई दुसरी झालेली. हातावरचे मिळेल ते काम करून या आई वडिलांनी पोटाला चिमटा देऊन आम्हाला शिकवले” असे तो भावुक होऊन सांगू लागला… हे सांगताना त्याचे डोळे पाणावलेले मला जाणवले.

      मी म्हटले “तुमच्या वडिलांचीही आता माझी भेट होईल. खूप समाधान व आनंद वाटेल मला !

      तो गालात हसला, म्हणाला, “माझ्या वडिलांनी दिवसा ट्रॅक्टर वर व रात्री मिळेल ते काम करून आम्हां तिघाही भावंडाना शिकविले. त्यांच्या कष्टाचे चीज झाले.” तेव्हढ्यात वाकडी गावाची चौफुली आली. मी गाडी थांबवली. त्याने वडिलांना फोन करून तशी कल्पना दिली होतीच.

      मी व भावी डॉक्टर खाली उतरलो. तेव्हढ्यात जुनाट होंडा गाडीवर त्याचे वडील विठ्ठलराव आले. उंचेपुरे, रापलेला चेहरा, अंगावर कामावरचे अक्षरशः मळके कपडे, वरची गुंडी उघडी पण अतिशय लोभस व कष्टाळू व्यक्तिमत्त्व मी जवळून पहात होतो.

      मी अदबीने हस्तांदोलनासाठी हाथ पुढे केला… त्यांनीही लाजत आपला हाथ पुढे केला. एका प्रचंड कष्टकऱ्याचा कडक व यशस्वी हाथ मी पहिल्यांदाच अनुभवत होतो… त्यांचे मनःपुर्वक खूप खूप अभिनंदन केले.

मी म्हणालो, “विठ्ठलराव, मानलं राव तुम्हांला. पोरांनी तुम्हां आई बापाचं नाव कमावलं.”

      त्यांचं उत्तर आलं, “आपण काढलेले वाईट दिस लेकरांना येऊ नये बस एव्हढंच मनासनी ठेवलं… बाकी भगवंताची क्रिपा..” हे वाक्य म्हणतांना डोक्यापासून ते पाया पर्यंत नागमोडी वेव्हज घेत ते ओशाळून अगदी अदबीने सांगत होते… “मी तुम्हाला पण ओळखतो. मी अन् सचिन एलम लई वर्षांपूर्वी एकदा ट्रॅक्टर चा पंप तुमच्याकडे घेऊन आलो होतो…”

      बराच वेळ विचार करीत असतानाचे उत्तर मला मिळाले. यांची स्मरणशक्ती दांडगी आहे आणि तीच या मुलात आल्यामुळे त्याची हुशारी उदयास आली…

     मी म्हणालो, “आता जग तुम्हांला ओळखील…”

      मनाला खूप समाधान वाटले, “एक फोटो होऊन जाऊ द्या डॉक्टर” असे त्या मुलाला म्हणताच तो लाजला. आपल्या वडिलांना इशारा करून वरची गुंडी लावायला त्याने  आवर्जून सांगितली.

       या वयात परिपक्वतेचा अनुभव घेणारा हा ‘विनायक’ आता आमच्या पंचक्रोशीतच नव्हे तर जवळपासच्या सगळ्या तालुक्यामधील शिक्षणातला ‘नायक’ झाला होता…

        मोटारसायकल लिलया वळवत विठ्ठलराव यांनी विनायकला पाठीमागे बसवून मला टाटा करीत आपल्या घराकडे निघाले. काळ्या मातीत राब राब राबून एक ‘नायक’ या बापाने या समाजाला दिला होता, कारण त्याची पै न पै कष्टाची होती आणि सृष्टी निर्मात्याला ती मान्य होती… ते दिसेनासे होइपर्यंत मी फक्त एकटक त्यांच्या कडे बघतच होतो…

अनुभवातील शब्द….

लेखक - राजेश्वर पारखे श्री रामपूर
Share This Article
error: Content is protected !!
×