Sshree Astro Vastu

Generic selectors
Exact matches only
Search in title
Search in content
Post Type Selectors

भाकरी कधी कुणी विकतं का?

संध्याकाळची वेळ होती,

मी माझ्या एका मित्राबरोबर सिंहगड रोडने जात होतो.

हिंगण्याच्या स्टॉपच्या अलीकडे एक किलोमीटर असताना पुढे वाहतुकीच्या कोंडीमुळे गाडी थांबवावी लागली इतक्यात आमची नजर रस्त्यावर खडी फोडणाऱ्या कुटुंबाच्या पालाकडे गेली.

(पाल म्हणजे तात्पुरती ताडपत्रीची झोपडी ),

तिथे तीन दगडाच्या मांडलेल्या चुलीसमोर त्या झोपडीची मालकीण भाकरी भाजत होती.

 

नवरा शेजारच्या बाजेवर जुन्या वर्तमानपत्राचा चुरगळलेला कागद वाचत बसला होता.

त्या बाजेखाली त्याचा छोटा मुलगा एका तुटलेल्या खेळण्याबरोबर खेळण्यात दंग होता.

वाहतूक अजून काही सुरळीत होत नव्हती.

 

माझा मित्र,जो एका मोठ्या कंपनीचा मालक होता,

अगदी टक लावून त्या टम्म फुगणाऱ्या बाजरीच्या भाकरीकडे बघत होता. गाडीची खिडकी उघडताच

त्या भाकरीचा खमंग दरवळ आमच्या कारच्या खिडकीतून आत येत होता.

 

 मित्राने लहानपणी खेड्यातील मित्राकडे अशी खरपूस भाकरी खाल्ली होती व त्या भाकरीची चव तो अजूनही विसरला नव्हता.

त्या नंतर मात्र त्याला परत तशी भाकरी खायला मिळाली नव्हती.

अचानक तो मित्र म्हणाला,

अरे संजू, आपण जर पैसे दिले तर ती बाई त्या भाकरी आपल्याला विकत देईल का?

 

मी त्याला म्हटलं,

अरे काहीतरीच काय वेड्यासारखं बोलतोयस,

तिची झोपडी म्हणजे काय हॉटेल आहे का आणि आपण अशी कशी भाकरी मागायची तिला?

 

क्षणभर त्याने विचार केला व गाडीचा दरवाजा उघडत मला म्हणाला,

चल उतर खाली.

मीही त्याच्या मागोमाग उतरलो.

 

झोपडी समोर उभं राहत त्याने त्या बाजेवर बसलेल्या त्या बाईच्या नवऱ्याला नमस्कार केला.

क्षणभर तो गोंधळून गेला.

पण लगेच म्हणाला,

साहेब, काही काम होत का?

सरळ विषयाला हात घालत माझा मित्र म्हणाला,

मला तुमच्या या चुलीवरच्या भाकरी खायच्या आहेत तुम्ही मला त्या विकत द्याल का?

 

ती दोघ नवरा बायको आम्हा दोघांच्या तोंडाकडे बघतच राहिली.

काय उत्तर द्यावं तेही त्यांना सुचेना,

“काय साहेब गरीबांची चेष्टा करता”

एवढंच तो म्हणाला.

अरे बाबा, मी सिरियासलीच बोलतोय,

अशा भाकरी आमच्या घरात कुणाला बनविता येत नाहीत

व घरात चुलही नाही.

लहानपणी एकदा मी अशी भाकरी खाल्ली होती व आता  यांना भाकरी करताना बघून मला त्या चवीची आठवण झाली.

 

आता त्या नवरा बायकोला पटलं की खरचं यांना भाकरी हव्या आहेत,

बाजेवरून गडबडीत उठत तो म्हणाला,

बसा दोघे या बाजेवर.

(बोलताना समजलं की गावाकडे दुष्काळ पडल्यामुळे हे शेतकरी कुटुंब गुर ढोरं, पडीक शेत म्हातारा, म्हातारीवर सोपवून रोजीरोटीसाठी शहरात आले आहेत)

 

आमचं बोलणं चालू असतानाच तो बायकोला म्हणाला

“सुंदे! साहेबाना दे त्या चार भाकरी.

वाचत असलेला जुना पेपर त्याने बायकोच्या हातात दिला.

तिने छानपैकी त्याच्यावर त्या ताज्या खमंग भाकरीची चवड  ठेवली वर अजून तव्यातील चौथी गरमागरम भाकरीही त्याच्यावर ठेवली.

मस्तपैकी मिरचीच्या खरड्याचा गोळा वर ठेवला व ते पार्सल मित्राच्या हातात दिलं.

 

मोठा खजिना मिळाल्याचा भाव मित्राच्या चेहऱ्यावर दिसत होता.

 

त्याने आभार मानत खिशात हात घातला व पाचशेची नोट तिच्या नवऱ्याच्या हातात ठेवली.

 

‘आवो सायेब हे काय करता?

भाकरी कधी कोण इकतं का?”

 

बायकोही त्याला दुजोरा देत म्हणाली,

“सायेब भाकरीच पैसं  घेतलं तर नरकात बी जागा मिळणार नाय आमाला”

 

आम्ही दोघ त्यांचं बोलणं ऐकून दिङमूढ झालो मित्रालाही काय करावं सुचेना.

 

अचानक त्याने माझ्या हातात पार्सल देत गाडीचा दरवाजा उघडला व घरी मुलांसाठी घेतलेल्या खाऊची भली मोठी कॅरीबॅग काढली व पुन्हा झोपडीत शिरत ती पिशवी त्यांच्या  हातात देत म्हणाला,

तुमच्या भाकरीची बरोबरी या खाउशी होणार नाही पण तरीही तुमच्या बाळासाठी ठेवा हे.

 

मी गाडी स्टार्ट केली,

मित्र शेजारी बसून त्या गरमागरम भाकरीचा आस्वाद घेत होता.

एक अख्खी भाकरी हडप करून राहिलेल्या भाकरी पुन्हा कागदात बांधत म्हणाला,

आता या राहिलेल्या उद्या खाणार.

 

गाडी चालवताना एकच विचार मनात रुंजी घालू लागला..

“गरिबीतही किती औदार्य असत या लोकांमध्ये”!

 

भाकरी ही विकायची वस्तू नाही

हे तत्वज्ञान त्यांना कुठल्या शाळा कॉलेजात जाऊन शिकावं लागलं नाही,

आणि हो अख्ख्या जगाला भाकरी खाऊ घालणारा हा पोशिंदा तुमच्या चार भाकरीचे पैसे घेईल का? माझं शेजारी लक्ष गेलं,

मित्र तृप्तीचा ढेकर देऊन घोरत होता.

ब्रम्हानंदी टाळी लागल होती त्याची.

त्याच्या चेहऱ्याकडे बघितल्यावर समजले

सुख म्हणजे नक्की काय असतं?

Share This Article
error: Content is protected !!
×