अवघा रंग एक झाला- Avagha Rang Ek Jhala - सावळी आज येणार नाही आजीच्या बहिणीच्या नातीने शेजारच्या गॅलरीतून ओरडून निरोप दिला,... ते ऐकून आजी अस्वस्थ झाल्या,...पडल्या पडल्या डोळ्यातून पाणी गळायला लागलं आता आपलं नॅपकिन कोण बदलणार ..?खरंतर सावळीमुळे आपण एवढं व्यवस्थित राहू शकतो आणि सावळी येणार नाही म्हणते पण का काय झालं,..?अगतिक होऊन चिडून ओरडून आजींनी विचारलं ,..त्यावर नात म्हणाली,.. आजी कर्फ्यु लागला आहे रस्त्याने जीवावर उदार होऊन येते ती गेल्या 15 दिवसांपासून तुम्हाला काय माहिती?? हो बाहेर काय वातावरण आहे ते,...एवढं बोलून ती नात आत निघून गेली,...आजीला जाणवायला लागलं खुपच उष्ण पाणी आपल्या गालावरून ओघळतंय आपल्याला आता खरंतर मरून जावं वाटतंय,..देवा काय खेळ लावला आहेस रे ह्या जीवाचा..? लवकर सम्पव तरी अरे आमच्या सारखी मरण मागणारी माणसं सोडून तरुण लोक घेऊन चालला न्याय कुठे तुझा,...?तेवढ्यात आजीला लॅच उघडल्याचा आवाज आला,..आजी ओरडली ,..भयभीत होऊन कारण चावी फक्त सावळीकडेच असते,..आणि आताच तर निरोप असा आजी विचार करत होती तर समोर गोड हसणारी सावळी,.. आजी म्हणाली," काय गम्मत करतेस का ग माझी म्हातारीची??"सावळी ओढणी कमरेला बांधत म्हणाली,..गम्मत केली नाही माझ्या बापाने केला होता तो फोन कारण खरंच बाहेर वातावरण खराब झालं आहे,..बाप म्हणतो लग्न आहे तुझं,...काही झालं तुला तर,..? ऐकून आजीला हुंदकाच फुटला आणि आजी चादरीत तोंड लपवून रडू लागली,...सावळे किती करतेस ग माझ्यासाठी,...?नक्की आज पण भांडून आली असशील घरच्या लोकांसोबत,...सावळीने लगेच आजीचा हात हातात घेतला,..आजी रडू नका तुमचे खुप उपकार आहेत माझ्यावर त्यासाठी हे करणं तर काहीच नाही,..चला उठा स्वच्छ व्हा छान सावळीच्या मदतीने आजी अगदी प्रसन्न तयार होऊन मस्त बसली ,...आपल्या काळ्याभोर विठ्ठल मुर्ती समोर,...सावळीची सगळी लगबग सुरू होती,..छोट्याश्या मूर्तीला तुळशीहार तयार होता,.. त्याच्या समोर पुसून नाजुक रांगोळी रेखाटली होती,...चांदीची निरंजन चकचकीत घासुन साजुक तुपाने गच्च भरलेली शांतपणे तेवत होती ,...आजी शांत मनाने जप करत होती,..स्वयंपाक घरातुन सावळी बाहेर आली चहा घेऊन,... आजीने चहा घेताना विषय काढलाच,..".सावळे तू नस्तीस तर काय झालं असतं ग माझ्या म्हातारीचं,...?? नुसता पैसा असुन उपयोग नसतो बघ ...आयुष्यात मायेनं जवळ घेणारं लागतंच कुणीतरी,...नुसतं रक्ताच्या नात्याचं नाही ग बाई मनाच्या नात्याचं,..हो किनी ग,...जशी मला तू,...!" सावळी म्हणाली आजी,..".हे सगळं तुम्ही जीव लावला म्हणून आहे,..टाळी एका हाताने वाजत नाही,...आजी मला आजही आठवतं,.. एक तर पोरगी आणि त्यात काळी म्हणून बाप चिडत होता,..मारत होता,..म्हणून आई तुमच्याकडे कामाला येताना घेऊन यायची,.. तुमच्या मनाला पाझर फुटला माझं शिक्षण केलं,...आज मी चांगल्या हॉस्पिटलमध्ये नर्स आहे ती तुमच्यामुळे आणि मग माझं शिक्षण जर तुमच्या कामाला नाही आलं तर काय उपयोग हो,...मध्ये आई गेली तेंव्हा तर खरा आधार पैशानं, मनानं तुम्ही दिला मला,...आणि त्या पैश्यापेक्षा संस्काराची शिदोरी दिलीये आजी,...तुमच्याकडे असलेले सणवार,भजन,पुजा आनंद कसा मिळवावा ते शिकवून गेले,...ते सगळं मला अनुभवू दिलंत तुम्ही,...आजोबांना जाऊन वर्ष पण झालं नाही तर तुम्ही अश्या पॅरॅलीस झाल्या,... तुम्हाला मुलबाळ नसलं तरी तुम्ही मला मुली सारखंच जपलं ना,...मग माझं कर्तव्य मी करतीये आणि करणार,...होणाऱ्या नवऱ्याला पण सांगितलं आहे मी,... सकाळचे दोन तास माझे आजीसाठी आहेत खास लग्नानंतर सुद्धा,...म्हणुन सांगते आजी तुम्ही काळजी करू नका,...मी येते बरोबर कशीही,... मला माहित आहे मी गेल्यावर तुमच्या बहिणीची नात जी वर राहते ती येते तुमच्या मदतीला,... पण तुम्हाला पण मी येऊन गेल्या शिवाय करमत नाही ना,???"...दोघी हसल्या, हसता हसता आजीच्या डोळ्यात पाणी आलं,...आजी म्हणाली,.."सावळे तू हि विठ्ठल मुर्ती दिली आणि तेंव्हा पासुन मला तू सतत जवळ असल्यासारखं वाटतं,... तू तशी फार हुशार मी केलेल्या सगळ्या पंढरपूर वाऱ्या तुला माहीत होत्या,... पण ह्या 3 वर्षापूर्वी गुढग्यांच्या दुखण्याने मला वारीला जाता नाही आलं म्हणून मी नाराज होते तर तू चक्क हि मूर्ती आणून ठेवली माझ्या हातात,...काळीभोर आणि शांत बरं आजी आता जाऊ का मी,..."आहो माझी आजीसासू सिरीयस आहे म्हणून लग्न उद्याच करायचं ठरलंय,... हे लॉकडाऊन काही उघडत नाही म्हणून घरातच करणार आहे ,...उद्या फक्त धकवून घ्या,...परवा येतेच मी आशीर्वाद द्या मला,...आजीला गहिवरून आलं,..सगळ्यांनी काळी म्हणून हिणवलेलं लेकरू,...कष्टाळू आणि प्रामाणिक होतं,... उद्या तिच्या नव्या आयुष्याला सुरुवात होणार होती,...तिला जवळ घेत आजी म्हणाली काय देऊ ग तुला,...?तशी सावळी म्हणाली,..".आनंदी रहाण्याचा आशीर्वाद बस बाकी काही नको,..." आजीला तेवढ्यात काहीतरी आठवलं,...आजी म्हणाली,"सावळे तू खरेदी केली कि नाही तुला माझ्या त्या पैठणी लुगड्यासारखं लुगडं घालायचं होतं ना ,...आणि त्यावर मोत्याची नथ,..." सावळी हसली आणि म्हणाली,"आजी हे लॉकडाऊन इतकं झटपट झालं ,...खरंतर आईने पैसे साठवून ठेवले होते मला तस पैठणी लुगडं घ्यायला पण आता राहिलं,... जाऊ द्या,... नंतर घेऊ चला येऊ मी,..?" आजी म्हणाली," थांब ते कपाट उघड,...ती खालच्या कप्प्यात सुती कापडाची घडी आण इकडे,..." सावळीने पटकन ती घडी ठेवली हातात,...आजींन त्यातुन लालचुटुक पैठणी काढली,...आणि सावळीला म्हणाली," घाल लग्नात,... आणि परवा मला आणुन दाखव कशी दिसली ते,..." तशी सावळी म्हणाली," आजी,... अहो मी तुमच्यासारखी पैठणी घेणार होते पण रंग हा नाही अहो माझ्या सारख्या काळीला चांगली तरी दिसेल का,..?" आजी म्हणाली सावळे,..."अग माणसाचा कातडीचा रंग गौण असतो ग,...त्याच मन ज्या रंगाचं असतं ना,..त्यावर त्याच सौन्दर्य असतं,.... म्हणजे,.... कपटी,धूर्त,प्रेमळ,निरागस असे वेगवेगळे रंग असतात त्यावर विचार करायचा,...आणि आता मला सांग ह्या विठ्ठलाचं वस्त्र कोणत्या रंगाच आहे ग,...?" सावळी हसुन म्हणाली ,"अगदी असंच लाल,..." आजी लगेच म्हणाली,...मग त्याला ते वाईट दिसतंय का,??? सावळी म्हणाली," आजी तो देव आहे,...त्याला चांगलंच दिसणार,..." आजी हसली म्हणाली,..."सावळे देवत्व मूर्तीत नसतं असं नाही पण मूर्तीशिवाय जेंव्हा ते बघायच असतं ना तर ते,...माणसाच्या कृतीत,कष्टात,स्वभावात बघायच असतं,... आता ह्या महामारीच्या काळातच तर तू म्हंटली ना,...हे शेतकरी, पोलीस,नर्स,डॉकटर,सफाई कामगार अगदी देव बनुन पृथ्वीवर वावरत आहेत म्हणून,..." सावळीने दोन्ही हात कोपऱ्यापासून जोडले आणि आजीला म्हणाली,"बोलण्यात मी तुम्हाला काही हरवू शकणार नाही,...द्या ते लुगडं मी परवा नेसुन आणि नवऱ्याला घेऊन येईल आशीर्वाद घ्यायला आणि सेवेला पण येईन,...जाऊ का आता,...??आजीने नथीची डबी पण ठेवली हातात,..तशी ती घाबरत म्हणाली,सोन्याची आहे आजी हि नथ मला नको,...आजी म्हणाली "घालुन परत आणुन दे मग तर झालं,...अग पैठणीवर शोभुन दिसेल,..." सावळीचे डोळे पाणावले,...ती पटकन आजीच्या गळ्यात पडली,...आणि चटकन निरोप घेऊन निघाली,.. आजी हताशपणे पडून राहिली,...विठ्ठलाकडे पहात,... तिसऱ्या दिवशी लालचुटूक पैठणी घालुन नवऱ्यासोबत ती आजीच्या अपार्टमेंटच्या गेटमधून आत शिरली तसं आजीच्या नातीने तिला वर ये म्हणून हाक मारली,...सावळीला खरंतर आधीआजीला भेटायचं होत पण आधी तिच्याकडे जावं लागलं,... नातीने दरवाज्यातच तिला थांबवलं,...तोंडाला मास्क बांधूनच ती बोलत होती,..तिने सावळीला आजीच्या फ्लॅटची चावी मागितली आणि म्हणाली सावळे",... अग परवा तू गेल्यावर काही तासात आजी गेली अग,...तू केलेलं जेवण द्यायला मी फ्लॅटमध्ये गेले तर आजी रडत होती,...मला म्हणाली,..." माझ्या सावळीच लग्न आहे,...तिला दिलेली पैठणी आणि नथ तिला माझी आठवण म्हणून सांग ,...मी जवळ बसले तर मला म्हणाली,ती विठ्ठल मूर्ती दे माझ्या जवळ,...त्या मूर्तीला कवटाळून म्हणत होती खरं सांग तूच सावळी बनून येत होतास ना,...आणि प्राण सोडले ग तिने,... सावळी सुन्न होऊन गेली,...नवऱ्याने तिला सावरलं,...ती निघाली आणि निघताना म्हणाली त्या नातीला मला ती विठ्ठल मूर्ती देता का???नातीने लगेच फ्लॅटचे कुलूप उघडून ती मूर्ती तिच्या हातात दिली,...सावळी विठ्ठल घेऊन चालू लागली,...पण सावळीच्या मनातला प्रश्न विठ्ठल ऐकत होता,... सावळी मनात म्हणत होती,.."आजी तुझी सेवा केली म्हणून मी तुझा विठ्ठल कि तू मला चांगलं जगणं दिलंस म्हणून तू माझा विठ्ठल,..??" माणुसकीचा हा अवघा रंग एक झालेला पाहून विठ्ठलमूर्ती हसुन म्हणत होती,... अवघा रंग एक झाला..