आधीच्या काळातही प्रेम होत असे पण प्रेम विवाह फारसे होत नसत. समाज, घरच्यांच्या आदरयुक्त भितीने सहसा कुणी अशी पावले उचलावयास धजावत नव्हते व ज्या कोणी असं केलं तर तो फारच मोठा क्रांतीकारी निर्णय असे. अशा प्रेमांची वाट फारच बिकट असे व विवाह झाला तरी निर्वाह लागणे मात्र फारच कठीण होउन बसायचे. समाज वाळीत टाकायचा. झालेल्या संतती ला ही त्याचे परिणाम भोगावे लागायचे. चित्रपटात दाखवण्यापुरते सर्व ठिक असायचं पण प्रत्यक्षात ते एक मृगजळ असायचं. पण आता काळ बदलला आहे. चालता बोलता, दिवसातून कित्येक वेळा माणसं प्रेमात पडू लागली. परिणामांची तमा बाळगणे ही सोडून दिलं आहे. आता हे रोजचंच झालं असं समजून लोक ही दुर्लक्ष करू लागले. पण अशा प्रेमांना जर खोली असेल तरच रहायची खोली ही मिळते. अंतःकरणापासून केलेली आराधना व प्रेम हे फळ देतेच, मग त्यासाठी धर्म, सीमा, देश, भाषा यांचेही बंधन उरत नाही. आज सामायिक करीत असलेली एखाद्या चित्रपटाला शोभेशी कथा ही याच विषयावरची आहे. आनंद घ्या.
तस्वीर तेरी दिल में….. जिस दिन से उतारी है!
शार्लटची चारूलता होताना!
लेखक- संभाजी बबन गायके.
स्वीडन या संपन्न देशातल्या एका राजघराण्यातली ही गोंडस, सुंदर, देखणी राजकन्या…. शार्लट! तिच्या नावाचं इंग्लिश भाषेतील स्पेलिंग Charlotte असं काहीसं तिरपागडं आणि आपल्याला चार्लेट असा उच्चार करायला उद्युक्त करणारं. युरोपातले पालक आपल्या मुलीचं नाव ठेवायचं झाल्यास याच नावाला पसंती देतात.
या नावाचा एक अर्थ ‘नाजुक’ असाही होतो. आणि ती होतीही तशीच. सडपातळ आणि सिंहासारखी कटी असलेली…. जणू एखादी नाजूक वेल, लता! हीच शार्लट चारूलता कशी झाली याची ही हृदयंगम कहाणी.
शार्लट अठरा-एकोणीस वर्षांची असेल. मनानं कलावंत असलेली शार्लट सातत्याने कलेची उपासना करण्यात दंग असे. तिला माणसांत आणि माणसांच्या चित्रांमध्ये खूप रस होता. रेषा आणि रंगांनी कागदावर साक्षात माणूस चितारता येतो याची तिला खूप गंमत वाटे. लंडन येथील एका कला महाविद्यालयात ती चित्रकला शिकत होती. व्यक्तिचित्रं साकारू शकणाऱ्या सर्वोत्तम कलाकाराच्या शोधात ती होती… तिलाही हे तंत्र शिकून घ्यायचं होतं.
ही कला अंगी असणारा एक अवलिया माणूस तिच्या घरापासून ९७०० किलोमीटर्सवर आहे, हे तिला माहीत झाल्यापासून ती त्याला भेटायला उतावीळ झाली. आणि आपल्या व्हॅन मधून त्याच्याकडे निघाली सुद्धा.
लंडनवरून तब्बल बावीस दिवसांनी ती दिल्लीत पोहोचली…. तिला हवा असणारा कलाकार इथेच तर होता. प्रद्युम्न कुमार त्याचं नाव. महानंदिया हे कुलनाम. ओरिसातल्या अत्यंत दुर्गम भागात जन्मलेला हा तरूण पुस्तकी अभ्यासापेक्षा निसर्गामध्ये, रंगांमध्ये जास्त रमतो याची त्याच्या पोस्टमनची नोकरी करीत असलेल्या वडिलांना अतिचिंता होती. त्याचे ग्रह काय म्हणताहेत हे जाणून घेण्यासाठी त्यांनी प्रद्युम्नची पत्रिका एका ज्योतिषाला दाखवली…. हा मोठा कलावंत तर होईलच पण याचं लग्न दूरवरच्या एखाद्या सुंदर, श्रीमंत मुलीशी होईल… तिची राशी वृषभ असेल! आणि तीच याला शोधत येईल!
आपले वडील आणि ते ज्योतिषी यांच्यातला हा संवाद छोटा प्रद्युम्न चोरून ऐकत होताच…. त्या लहान मुलाला तोवर लग्न वगैरे विषय माहीत नव्हता… पण आपल्या पत्नीची राशी वृषभ असेल हे त्याने पक्के ध्यानात ठेवले!
प्रदयुम्न प्रचंड जातीयवाद, गरीबी, अवहेलना यांना तोंड देत देत शेवटी चित्रकलेच्या शिक्षणासाठी दिल्लीत पोहोचला. शिकताना उदरनिर्वाहाचा प्रश्न त्याने लोकांची पोर्टेट्स काढून देऊन सोडवला. भारताच्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांचे हुबहू पोर्टेट काढून प्रदयुम्न यांनी सर्वांची वाहवा मिळवली.
एक दर्जेदार कलाकार म्हणून प्रदयुम्न आता दिल्लीत प्रसिद्धीस आले आणि याच जोरावर त्यांनी दिल्ली प्रशासनाकडून कनॉट प्लेस मधील प्रसिद्ध आणि पवित्र कारंज्याजवळ पोर्टेट काढून देण्यासाठी बसण्याची परवानगी मिळवली.
गोष्ट आहे १९७५ मधली. प्रद्युम्न असेच त्या कारंज्याजवळ बसून लोकांची पोर्टेट्स काढून देण्यात मग्न होते. शार्लट त्यांच्यासमोर उभी राहिली… “माझं पोर्टेट काढून द्याल?”
तिच्या प्रश्नाने ते भानावर आले आणि आपल्या समोर प्रत्यक्षात जणू एक चित्रच उभे असल्याचं त्यांनी पाहिलं… चार्लट! ती त्यांच्या समोर बसली. त्यांनी तिच्या डोळ्यांत पाहिले…. निळेशार डोळे! कुणीही हरवून जावे असे. इथपर्यंत प्रद्युम्नसाठी ती एक कलाकार विद्यार्थिनी, त्याची ग्राहक एवढंच होती. कितीतरी वेळ ती त्यांच्यासमोर स्तब्ध बसून होती. त्यांना वेगळं सुंदर व्यक्तिचित्र काढण्याची गरजच नव्हती…. तिचं सौंदर्य कुंचला आणि रंग यांच्या माध्यमातून आपसूकपणे कागदावर चितारलं जात होतं. बघता बघता चित्र पूर्ण झालं आणि ते चित्र बघता बघता चार्लट मंत्रमुग्ध झाली.
प्रद्युम्न यांनी तिला अचानकपणे विचारलं, ”तु वृषभ राशीची आहेस का?”
तिने हो म्हणताच प्रद्युम्न नकळत म्हणून गेले…. ”मग तु माझी पत्नी होशील!”
हे ऐकताच सुरुवातीला चार्लट भांबावूनच गेली असावी…. मग ते पुढे भेटत राहिले. आता प्रद्युम्न तिचं चित्र कागदावर नव्हे तर त्याच्या हृदयाच्या पटावर रेखाटू लागले…. चार्लटचा राजकुमाराचा शोध संपला होता…. ते दोघेही हिंदु रितीरिवाजानुसार रीतसर विवाहबद्ध झाले… चि.सौ.कां.चार्लट आता सौ. चारूलता प्रदयुम्न महानंदिया झाली होती.
“आपण आता स्वीडनला जाऊयात!” एके दिवशी चारूलता त्यांना म्हणाली.
“नको, माझा अभ्यासक्रम पुरा होऊ देत. आणि मला तुझ्या खर्चाने तिकडे यायला नको आहे. मी माझ्या हिंमतीवर येईन. मग त्यासाठी वाटेल ते करावं लागलं तरी बेहत्तर.”
त्याचा हा विचार तिला सुखावून गेला… स्वाभिमानी आहे हा राजकुमार.. तिनं मनात म्हणलं. आणि ती मायदेशी निघून गेली.
त्याकाळी पत्र हे मोठं माध्यम होतं संवादाचं. इतक्या दूरवर पत्रं पोहोचायला उशीर लागायचा… पण संदेश या हृदयापासून त्या हृदयापर्यंत वायूवेगानं पोहोचायचा. तस्वीर तेरी दिल में.. जिस दिन से उतारी है… फिरू तुझे संग लेके, नये नये रंग ले के… सपनों की महफिल में… तुफान उठायेगी दुनिया मगर… रुक न सकेगा दिल का सफर!….. असं झालं असेल!
मध्ये बरेच दिवस, महिने गेले. राजकन्या राजकुमार त्याच्या ऐटबाज घोड्यावर बसून आपल्याकडे येईल या वाटेकडे चार्लट… चारू डोळे लावून बसली होती.
पण राजकुमार फक्त कलेच्या राज्यातील राजकुमार. खिशात दाम नव्हता. मग जवळच्या साऱ्या चीजवस्तू विकून टाकल्या… बाराशे रुपये आले. साठ रुपयांची एक जुनी वापरलेली सायकल विकत घेतली. ब्रश, रंग, कागद, कॅनव्हासची पिशवी पाठीला अडकवली आणि राजकुमार मोहिमेवर निघाले. रस्त्यात लोकांची चित्रं काढून दिली आणि अन्न, निवारा मिळवला. काही दिवस सलग दोन-तीन दिवस उपवाशी रहावे लागले. विरोध, संशय, मानहानी सहन करावी लागली.
दिल्लीतून अमृतसर. तिथून अफगानिस्तान, इराण, तुर्की, बुल्गेरीया, युगोस्लोव्हाकीया, जर्मनी, ऑस्ट्रीया… डेन्मार्क! किती दूरचा प्रवास… किती कष्ट. नशिबाने त्यावेळी आंतरराष्ट्रीय सीमांवरील नियम काहीसे सोपे असावेत. कारण प्रद्युम्न यांना कुठल्या सीमेवर फार थांबावे लागले नाही. उलट या माणसाच्या सहनशक्तीपुढे, त्याच्या उद्देशामुळे तिथले अधिकारीही स्तंभित झाले.
खरी अडचण आली ती डेन्मार्कच्या सीमेवर. पाच महिने आणि बावीस दिवसांनी प्रद्युम्न स्वीडनच्या सीमेवर पोहोचले….. आपल्या देशातल्या राजघराण्यातली एक सुंदर कन्या भारतातल्या एका गरीब माणसाच्या प्रेमात पडूच कशी शकते, लग्न कशी करू शकते याचं त्यांना नवल वाटणं साहजिकच होतं. आणि हा माणूस चक्क सायकलवर एवढा प्रवास करून येथे पोहोचतो! प्रद्युम्न यांच्याजवळ त्यांच्या विवाहाची काही छायाचित्रे होती. अधिकाऱ्यांनी चार्लटशी संपर्क साधला…. ती धावत निघाली… तिचा राजकुमार पोहोचला होता. प्रदयुम्न यांनी तिच्या शहरापर्यंतचा प्रवास मग रेल्वेतून केला….. वधू वराला घ्यायला सहकुटुंब आली होती…. हे खरं रिसेप्शन!
प्रेम सिद्ध झाल्यावर जगाचा विरोध मावळत जातो. इतर रंगाच्या, वंशाच्या माणसांनी जवळपास राहूही नये अशी समाजव्यवस्था असणाऱ्या त्या ठिकाणच्या उमद्या मनाच्या लोकांनी हा भारतीय जावई मनापासून स्विकारला!
भावनेच्या भरात अनेक विवाह होतातही. पण ते प्रदीर्घ काळापर्यंत टिकणे महत्त्वाचे असते. चारूलता आणि प्रद्युम्न यांचा विवाह सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या आसपास पोहोचतो आहे. चारूलतेच्या संसार वेलीवर फुले उमलली आहेत. स्वीडनच्या कला विश्वात प्रद्युम्न यांना मानाचे स्थान मिळाले आहे. ओरिसातील एका विद्यापीठाने त्यांना मानद डॉक्टरेट प्रदान केली आहे. चार्लट आणि प्रद्युम्न कुमार महानंदिया(Mahanandia) आपल्या महान इंडियाचं परदेशात, जगात प्रतिनिधीत्व करत आहेत, असं म्हणल्यास वावगे ठरणार नाही.
या हृदयस्पर्शी प्रेमकथेवर चित्रपट निघणार नाही, असे होणार नाही. चित्रपटातून काय, कसे दाखवले जाईल, काय नाही.. हे ठाऊक नाही. पण हे वाचून तुमच्याही मनाच्या कॅनव्हासवर एक व्यक्तिचित्र निश्चितच रेखाटले गेले असावे… फक्त या व्यक्तिचित्रात एक नव्हे तर दोन व्यक्ती आहेत… चार्लट- चारूलता आणि प्रद्युम्न!
(मागे एकदा ही कथा वाचली होती. पण त्यावेळी मी फेसबुकवर लिहित नव्हतो. आज पुन्हा ही कथा समोर आली आणि तुमच्यासाठी लिहिली.
©®संभाजी बबन गायके.
(Exclude
९८८१२९८२६०
(आवडल्यास शेअर करताना कथेत कुठलाही बदल न करता मुळ लेखकाच्या नावासहच शेअर करा ही विनंती. अशा सकारात्मक संदेश असलेल्या कथा वाचण्यासाठी माझ्या 9325927222 या व्हाटसअप क्रमांकावर संपर्क साधा -मेघःशाम सोनवणे)
आजची ही कथा स्वतः शिक्षक, लेखक श्री. संभाजी बबनराव गायके, पुणे यांच्या सौजन्याने.
C/P.)